महात्मा फुलेंच्या कार्याचा आदर्श घ्यावा.- ॲड.समीर मखरेंचे प्रतिपादन .
( भिमाई आश्रमशाळेत महात्मा फुलेंना अभिवादन !!)
इंदापूर: प्रतिनिधी ( दि.२८) तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे अविरतपणे समाजकार्य फुलेंनी केले. बहुजन समाजात अंधारातून प्रकाशाची ज्योत महात्मा फुलेंनी पेटवली. फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात काढली, हे सर्व महान कार्य महात्मा फुलेंनी केले,म्हणून समाजाने महात्मा फुलेंच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे गौरोद्गार इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे विद्यमान सचिव ॲड. समीर रत्नाकर मखरे यांनी काढले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते.
पुढे बोलताना ॲड.मखरे म्हणाले की,महात्मा फुलेंच्या कार्यातून धडा घेत शिक्षण हाच यशाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्याला फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस इंदापूरातील प्रतिष्ठित कांदा व डाळींब व्यापारी (आडतदार) मोहन दादा गाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिना निमित्त "माझे संविधान, माझा अभिमान" या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत प्रशालेत आयोजित केलेल्या स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला मखरे (काकी), संचालक गोरख तिकोटे, युवराज बन सर व संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रेश्मा झेंडे यांनी तर सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

