युएईत भारताच्या आयोजनात सुरू असलेल्या सातव्या टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्युझिलंड विरूध्द भारताला अनपेक्षित पराभव स्विकारावा लागला. सलग दोन मोठे संघ पाकिस्तान व न्युझिलंडविरुद्ध झालेल्या पराभवाने अ गटाच्या तुलनेत सोप्या असलेल्या ब गटातून उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशेला सुरुंग लागला आहे. उर्वरीत तीन सामने अवघड असलेल्या धावगतीने जिंकणे भारताच्या दृष्टीने कठीण असल्याने भारत या स्पर्धेतून बाद झाल्यातच जमा आहे.
संघात एका पेक्षा एक सरस व खोऱ्याने धावा ओढणारे फलंदाज. पोत्याने बळी घेणारे गोलंदाज. कोटयावधी रुपये मानधन घेणारे हेडकोच, फलंदाजी कोच, गोलंदाजी प्रशिक्षक, कोणता खेळाडू फिट आहे की अनफिट हे न कळणारे फिजियो, कागदोपत्री कोणतेही मानधन न घेता मेंटॉरची भूमिका बजावणारा भारताचा तथाकथीत सर्वात यशस्वी कर्णधार, एवढी सगळी फौज दिमतीला असताना दोन सामन्यात दोन नामुष्कीजन्य पराभव, प्रतिपक्षाचे अवघे दोन बळी व टिट्वेंटी सारख्या तोडफोड करणाऱ्या खेळात अवघे सहा षटकार अशी लाजिरवाणी कामगिरी बघून देशातील सामान्य क्रिकेट शौकीन ते क्रिकेट पंडितांमध्ये संघाविषयी असंतोष पसरला आहे.
भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तान विरूध्द असून कागदोपत्री अफगाण संघ भारतापेक्षा कमजोर दिसतो. परंतु सध्याचा भारतीय संघाचा खेळ व आत्मविश्वास बघता तो सामनाही भारताच्या दृष्टीने सोपा नसेल. सध्या तरी अनेक तज्ञांच्या मते अफगाणिस्तानलाच पसंती दिली जात आहे. याप्रमाणे जर निकाल लागला तर तो भारतीय क्रिकेटसाठी अतिशय वाईट असेल. तूर्त तरी वरील दोन पराभवांनी भारतात भारतीय संघाविषयी वातावरण दूषित झाले आहे.
भारताच्या संघातील अंतर्गत वातावरण दूषित असल्यामुळे बीसीसीआयने खेळाडू व संघ प्रबंधंन यांच्यात सुमधूर संबंध साधण्यासाठी मधला दुवा म्हणून माजी कर्णधार एम एस धोनीला मेंटॉर म्हणून नियुक्त केले. आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यात ख्याती असलेला धोनी गरम डोक्याच्या कर्णधार कोहलीला शांत ठेवून योग्य मार्गदर्शन करेल असे वाटत होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात सर्वच गोष्टी उलट घडल्या. धोनी ना कोहलीला योग्य सल्ला देऊ शकला व खेळाडूंना मानसिक व भावनिक दृष्टया एकजूट ठेवू शकला. एकंदर धोनीला मेंटॉर म्हणून नेमण्याची बीसीसीआयची भूमिका सफसेल फोल ठरली.
संघाची निवड करणारी बीसीसीआयची निवड समितीही सध्या टिकाकारांच्या रडारवर असून सर्व गोष्टी माहिती असतानाही हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार व वरूण चक्रवर्ती या खेळाडूंना शारिरीक दृष्टया तंदुरुस्त नसतानाही संघात निवडणाऱ्या अनुभवी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघात घेतलेच कसे ? या तिघांच्या संघात निवडण्यामुळे संघाचे संतुलन बिघडले व संघ पराभवाच्या खाईत डुबला.
पंधरा जणांच्या संघातील उपलब्ध खेळाडूंना गरजेनुसार न खेळविणे संघाला महागात गेले. शिवाय फलंदाजीचे क्रम बदलणे खेळाडूंच्या मानसिकतेला उद्ध्वस्त करून गेले. शिवाय गोलंदाजांना हाताळताना कर्णधार अतिचंचल दिसला. कोहली, धोनी, शास्त्री, विक्रम राठोड, भरत अरूण, आर. श्रीधरन, फिजीओ नितिन पटेल हे मोठी नावं निव्वळ खोगीर भरती ठरले.
उपकर्णधार रोहीत शर्मा फलंदाजीत अतिशय बेजबाबदार प्रदर्शन करत आहे. शिवाय क्षेत्ररक्षणातही तो अतिशय शिथील दिसला. या स्पर्धेनंतर कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असून त्याची जागा रोहीत घेणार असून त्याचे या प्रकारे खेळणे संघासाठी फायद्याचे नसेल.
आयपीएल म्हणजे परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या चुका जवळून बघण्याचे केंद्रच बनले आहे. जगभरातील परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. भारतीय खेळाडूंशी सलगी करतात. त्यांचे कमकुवत दुवे हेरतात व मायदेशी जाऊन त्या माहितीचा उपयोग भारतीय संघाच्या विरूद्ध चाली रचण्यात करतात. याउलट बीसीसीआय भारतीय खेळाडूंना इतर देशातील कोणत्याही लिग स्पर्धेत खेळू देत नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना इतर देशांतील खेळाडूंचे विकपाँईट समजत नाही व अनुभवही मिळत नाही. भारतीय खेळाडूंची भलावण करायची, त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचे, गोड बोलून आयपीएलच्या माध्यमातून कोटीने रूपये कमवायचे ही परदेशी खेळाडू व क्रिकेट बोर्डांची चाल भारताला महागात गेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएल सुरू झाल्यापासून भारताला एकदाही टि- ट्वेंटी विश्वकरंडक जिंकता आला नाही. या उलट इतर देशांनी आयपीएल पासून बोध घेत आपल्या देशातील लिग स्पर्धा फुलवल्या व आपले क्रिकेट समृध्द केले. बीसीसीआय मात्र पैसे कमावण्यातच धन्यता मानत आहे. आयपीएलच बंद करा असा सूर सध्या देशभरातून आळवला जात आहे. तरीही बीसीसीआयने देखील आता आपल्या बऱ्याचशा धोरणात देखील बदल करण्याची वेळ आली आहे.
या दोन पराभवांमुळे भारतीय क्रिकेटचंच जगभर हसू झालं आहे. खेळाडूंवर टिका होत आहेत. ठिक आहे, खेळाडूच या पराभवाचे दोषी आहेत मात्र काही अविवेकी लोक खेळाडूंच्या कुटुंबीयांविषयी अभद्र टिपण्णी करत आहेत हे योग्य नाही. कर्णधार कोहलीच्या अवघ्या दहा महिन्याच्या मुलीवर गैरकृत्य करण्याचे वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध ! क्रिकेट हा खेळ आहे, त्याच्याकडे खेळ म्हणूनच बघणे गरजेचे असून खेळाडूंच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाशी खेळण्याचा कोणालाही काही एक अधिकार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

