शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतिक काळे या तरुणाने आत्महत्या केली. काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावे घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही ही नावे आहेत. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
प्रतिक काळे या तरुणाने 10 नावे घेतली. त्यातील सात नावांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील तीन नावांवर मात्र पोलिसांनी मौन पाळलेले आहे. जलसंधारण खाते सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांच्यासारख्या नेत्याचे नाव घेऊन एक तरुण आत्महत्या करत आहे.
30 तारखेला ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची चर्चा तिथे सुरु आहे. हे सगळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
काळे याला न्याय मिळणार की नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे. ते सत्ताधारी पक्षाचे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते काहीही करु शकतात, अशी त्यांची भूमिका आहे का? त्यामुळे प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
कारण ते मंत्रिपदावर असल्यामुळे प्रतिक काळेने नाव घेऊनही गडाख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे गडाख यांना पदावरुन दूर केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नाही, अशी आक्रमक भूमिका केशव उपाध्ये यांनी मांडली आहे.
काळे याच्या आत्महत्या प्रकरणाचे राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. काळे याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर सर्वांनी त्याच्या कुटुंबियाला या दुखातून सुरवातीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणे गरजेचे आहे.
त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देताना प्रत्येकाने त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याअगोदर त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
सध्या भाजपासह इतर काही व्यक्तींकडून या प्रकरणाचा धागा पकडून वातावरण तणावग्रस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संबंधित कुटुंबियांना मदत मात्र केलेली नाही. या कुटुंबाला या दुखातून बाहेर काढावे मग न्यायासाठी लढा उभारावा, अशी इच्छा अनेकांमधून व्यक्त केली जात आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

