shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजिंक्य राहणे कानपूर कसोटी जिंकला नसला तरी त्याच्या नेतृत्वात भारत अपराजितच...!


              कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम खराब खेळपट्टीसाठी बदनाम म्हणून गणले जायचे. परंतु भारत व न्यूझिलंड यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना पूर्णपणे पाच दिवस निर्विघ्नपणे पार पडला. सामन्याचे पाचही दिवस खेळाचे पारडे सातत्याने फिरत होते. अगदी तसाच सामन्याचा शेवटही चित्तथरारक झाला. शेवटचे बावन्न चेंडू न्यूझिलंडच्या अंतिम जोडीने खेळून काढत भारताच्या जबड्यातला विजय हिरावून नेला. भले हा सामना न्युझिलंड जिंकले नाही परंतु त्यांनी अनिर्णित राखलेला हा सामना त्यांचा नैतिक विजयच आहे. कारण भारतात येऊन भले भले संघ लोटांगण घेत असताना न्युझिलंडने दाखविलेली जिगर नक्कीच काबील - ए -तारीफ अशीच म्हणावी लागेल.

              न्यूझिलंड संघ कसोटीचा विद्यमान विजेता आहे. भारताच्या संघात अनेक नवोदित खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांना भारताला भारतात हरविण्याचे दावेदार कोणीही ठरवत नव्हते. मात्र सामन्याचे पाच दिवस त्यांनी भारताला झुंजवून विजयापासून दूर ठेवले. त्यामुळे त्यांना कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अनपेक्षितरित्या सामना अनिर्णित राखण्याचे चार गुण जवळ जवळ बोनस स्वरूपातच मिळाले. याचा फायदा त्यांना भविष्यात मिळणारच आहे. परंतु हातचे बारा गुण निसटल्याचे दुःख भारताला पुढे त्रासदायक ठरणार हे नक्की !
             
मागील काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझिलंड सातत्याने भारतीय संघाच्या मार्गात काटा बनला आहे. न्युझिलंडचे खेळाडू मितभाषी, शांत स्वभावाचे व वादापासून दूर राहात असल्याने ते वरकरणी भारताला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाहीत. उलट भारतीय खेळाडूंचा ते सन्मान करत असल्याने त्यांना दुश्मनही म्हणता येत नाही.
                
थंड डोकं व स्थिर मन असलेला न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीचा समवयस्क व घनिष्ठ मित्रही आहे. परंतु प्रत्यक्ष मैदानात त्यांच्यात जबरदस्त जुगलबंदी चालते. कानपूर कसोटीत कोहली शारिरीक व मानसिक थकव्यामुळे खेळला नसल्याने अजिंक्य राहाणेने भारताचं नेतृत्व केले. अजिंक्यच्या नेतृत्वात भारत अजूनही अजिंक्यच आहे, परंतु या सामन्यात राहणेची बॅट त्याच्यावर रुसलेली दिसली. शिवाय त्याने नेतृत्व केलेल्या सामन्यात जिंकण्याचा गोल्डन मिडास यावेळी न दिसल्याने राहाणेवर अनेक टिकाकार तुटून पडले आहेत. परंतु नाकाने कांदे सोलणारे व कोहली असता तर भारत हा सामना जिंकलाच असतात हे सांगणारे तथाकथीत क्रिकेट पंडित एक गोष्ट विसरलेले दिसतात की, भारत याच कोहली महोदयांच्या नेतृत्वात सन ( २०१९ ) दोन हजार एकोणावीसच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत,
 
सन २०२० मध्ये  न्यूझिलंड मध्ये कसोटीत दोन - शुन्य ( २-० ) वनडेत तीन - शुन्य, सन २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चँपीयनशीप फायनल मध्ये व युएईत झालेल्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाले आहे. म्हणजे सलग आठ सामन्यात न्युझिलंडने भारताला हरविले आहे. 
                
टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर भारताने टि ट्वेंटीचे नेतृत्व रोहीत शर्माला दिले त्यानंतर तीन सामन्यांची मालिका न्युझिलंड विरुद्धच झाली ती भारताने सरळ सरळ जिंकली. तसेच कानपूर कसोटीत शंभर टक्के मिळणारा विजय थोडक्यात  निसटला. पण संघ पराभूत झाला नसल्याने कोहलीच्या नेतृत्वापेक्षा रोहीत शर्मा व अजिंक्य राहाणेचे नेतृत्व उजवे असल्याचे आपोआप सिध्द होते.
                 
न्यूझिलंड विरूद्धचा दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. विराट कोहली कर्णधार म्हणून संघात पुन्हा परतणार आहे. मात्र पहिल्या कसोटीत संघ निवडताना केलेल्या चुका न्युझिलंड टिम मॅनेजमेंट दुरूस्त करून मैदानात उतरेल. शिवाय भारताला भारतात रोखता येतं हे कानपूर कसोटीत सिध्द झाल्याने दुणावलेल्या आत्मविश्वासासह ते भारताशी लढणार आहेत. त्यातच कोहलीची रणनिती न्यूझिलंडला पक्की माहिती असल्याने ते कानपूरला जमलं नाही ते मुंबईत करून दाखवतील ही काळ्या दगडावरची रेष आहे. शिवाय गेली तेहतीस वर्ष भारतात मालिका हरण्याची श्रृंखला त्यांनी खंडीत केल्यास कोणतेही आश्चर्य नसेल ! 
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close