भारताचे संविधान जगातील सर्व लोकशाही राष्ट्रात सर्वोत्तम- हर्षवर्धन पाटील.
इंदापूर महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी-इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे पूजन व सामूहिक वाचन करून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे यावेळी पूजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी संविधान प्रास्ताविकेचे यावेळी वाचन केले.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. भारत सरकारने २०१५ साली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती दिवशी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून १९४९ साली आपल्या देशाची संविधानची घटना आजच्या दिवशी देशाला अर्पण करण्यात आली. जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांमध्ये सर्वोत्तम संविधानाची घटना कोणाची असेल तर ती अभिमानाने सांगावे वाटते ती आपल्या देशाची आहे. लोकशाहीतील समानता ही संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन. डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी देशाचे पंतप्रधान होते. अनेक चांगल्या गोष्टी या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या. लोकशाहीमधील जनशक्ती ही खऱ्या अर्थाने संविधानाची ताकद आहे.'
यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके, संचालक विलासबापू वाघमोडे, तुकाराम जाधव, गणपत भोंग, भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब काळे, डॉ. तानाजी कसबे उपस्थित होते.

