शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागाला लागलेल्या आगीने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. राष्ट्रीय स्तरावर देखील याची दखल घेतली गेली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचा आकडा 12 वर गेला आहे. गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांकडे दिलेला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयातील सदर आगीचा प्रकार गुन्ह्याचा तपास तांत्रिक मुद्यांवर आहे. यामुळे मिटके साहेबांसमोर तांत्रिक मुद्यांमधील त्रुटींचा शोध घेत पुरावे उभे करण्याचे आव्हान आहे.
आगीची घटना मोठी असल्याने गुन्ह्यात तपासाची व्याप्ती देखील मोठी आहे. या घटनेच्या दाखल गुन्ह्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सुमारे 100 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.
दरम्यान सदर तपासाच्या सुरूवातीला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका, अशा चार जणांना अटक केली आहे. निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.
त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्यांच्या कार्यकर्तव्यातील हलगर्जीपणाबाबत धक्कादायक खुलासे केले गेले आहेत.
पोलीस सध्या या गुन्ह्यात तांत्रिक पातळीवर तपास करत असल्याने गती मिळताना दिसत नाही. तांत्रिक पातळीवर तपास करताना त्यातील त्रुटी शोधून गुन्ह्यात दोषसिद्धता करायची आहे.
ही प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया उपअधीक्षक मिटके यांनी दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाला अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वीज फिडरमधून खासगी रुग्णालय साईदीप हॉस्पिटलला दिलेला जोडची देखील चौकशी सुरू आहे.
त्यासाठी महावितरणच्या नगर कार्यालयाला पत्र पाठविल्याचेही मिटके यांनी सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

