अंनिसच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी हनुमंत भोसले तर कार्याध्यक्ष पदी सुधाकर तट..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट च्या बीड जिल्हा समितिचा जिल्हा प्रेरणा मेळावा केज येथील शासकीय विश्रामगृह येथे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मनोहर जायभाये यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी इतर महत्वपूर्ण विषयाबरोबरच नवीन जिल्हा समिती निवडण्यात आली. बीड जिल्ह्यात समितीचे कार्य अधिक व्यापकपणे वाढविण्यासाठी पुन्हा एकदा अंनिसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते हनुमंत भोसले यांची व कार्याध्यक्ष पदी जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर तट यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी मधुकर जावळे (बीड), जिल्हा प्रधान सचिव पदी गोविंद सोनपिर, सुकेशीनी नाईकवाडे व ऍड प्रशांत दगडखैर यांची निवड करण्यात आली.
आपल्या निवडीनंतर जिल्ह्यात महाराष्ट्र अंनिस चे कार्य प्रत्येक गावापर्यंत पोहोंचवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी भोंदूगिरी व अंधश्रद्धेच्या आडून होणारे समाजाचे शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंनिस ची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. गेली तीन दशकाहून अधिक काळा पासून ही चळवळ महाराष्ट्रात जोमाने काम करत आहे. भोंदूगिरी व अंधश्रद्धेद्वारे होणाऱ्या शोषण व्यवस्थेचे लाभार्थी असणाऱ्या समाजद्रोह्यांनी डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या केली. मात्र त्यानंतर त्यांच्या विचार कार्याला पुढे नेहण्यासाठी ही चळवळ अधिकच गतिमान झाली आहे. अंनिस च्या कार्याचा भोंदूगिरीद्वारे शोषण करणाऱ्या भोंदू लोकांनी चांगलाच धसका घेतला असून त्यांच्या फसवणुकीला चांगलाच लगाम लागला आहे. बीड जिल्ह्यातही सामान्य व गरीब आणि अज्ञानी व आता तर शिकलेल्या लोकांच्याही श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवणाऱ्या अडयांची संख्या वाढली आहे. समाजाचे कल्याण व हित साधणाऱ्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा अंनिस आदर व सन्मान करते. मात्र अध्यात्मिक विश्वाआडून लोकांची दिशाभूल करून प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भोंदूगिरी, करणी, भूत भानामती व इतर दैवी चमत्काराचे कारण सांगून समाजाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. बीड जिल्ह्यातील अशा लोकांचा शोध घेऊन त्यांची भोंदूगिरी उघडी करण्यासाठी बीड जिल्हा अंनिस मोठी मोहीम सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले व कार्याध्यक्ष सुधाकर तट यांनी दिली. यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यात ज्या गावातून समाजप्रबोधनाची मागणी होईल त्याठिकाणी चमत्काराच्या प्रयोगासह व्याख्यान दिले जाणार असल्याचेही हनुमंत भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे केज शाखेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हनुमंत भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, मनोहर जायभाये यांनी पदांची रचना जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले, सुधाकर तट यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा वार्षिक अंक व नजीकच्या काळात करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली, तर माधव बागगे सरांनी महाराष्ट्र अंनिसच्या सध्याच्या वाटचालीचा आणि संघटनेच्या विविध कार्याचा मागोवा घेतला.
राज्य निरीक्षक माधव बावगे यांनी सर्वानुमते झालेल्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा पुढीलप्रमाणे केली-
अध्यक्ष:- हनुमंत भोसले, उपाध्यक्ष:- मधुकर जावळे कार्याध्यक्ष:- सुधाकर तट, प्रधान सचिव:- गोविंद सोनपीर, सुकेशनी नाईकवाडे, अडवोकेट प्रशांत दगडखैर यांची निवड झाली.
उर्वरीत कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
कायदे विषयक सल्लागार:- अॅड. बाबुराव तिडके विविध उपक्रम कार्यवाह:- आश्रुबा गोरे , नानासाहेब फाटे,वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प:- एन आर लोंढे, बुवाबाजी विरोधी संघर्ष:- सिद्धार्थ सोनवणे , विज्ञान बोधवाहिनी:- , अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिका:- , सांस्कृतिक अभिव्यक्ती:- सिद्धार्थ तायडे प्रकाशने वितरण:- , युवा विभाग:- प्रवीण कांदे, महिला सहभाग:- सीता गणपत बनसोड प्रशिक्षण विभाग:- जी.एस सौंदळे , निधी संकलन:- राजेंद्र घोडके, जातिअंत संकल्प विभाग:- १)मिश्रविवाह- बाबुराव पोटभरे २)जोडिदाराची विवेकी निवड:- ३) जातपंचायत मूठमाती अभियान:-, मानसिक आरोग्य विभाग:- डॉक्टर राजेश इंगोले, सोशल मिडीया:- वैजनाथ कळसकर
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन माधव बावगे, मनोहर जायभाये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी गौतम बचुटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मांडल्यावर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास वरील पदाधिकाऱ्यासह श्रीमती प्रभावती अवचर, केज शाखेचे कार्याध्यक्ष विनोद ढोबळे, सचिव तथा जेष्ठ पत्रकार गौतम बचुटे, एन आर लोंढे,सागर बनसोड, भाई मोहन गुंड व शंकर जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

