------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची धमकी एका वीज वितरणाच्या कर्मचाऱ्याने सोशल मिडियावर दिल्यामुळे चांगलीच खळबळ माजली असून 'त्या' अधिकाऱ्या विरुद्ध एकत्र येऊन पोलीस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील वीज वितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले मयूर देवीदास राऊत या कर्मचाऱ्याने दि. १० नोव्हेंबर रोजी व्हाट्सअप्पवर मित्रांना पाठविलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, केज विज वितरण कंपणी कार्यालय, उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. सी. अंबेकर यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत आहे. अंबेकर हे सतत टार्गेट करून विनाकारण निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. तसेच मयूर राऊत हा कामा निमित्त त्यांच्या कार्यालतात गेल्यास त्याला तो कार्यालयात का आला? अशी विचारणा करून; त्याला एक लाख रु. दे. अन्यथा त्याला निलंबित करण्याची धमकी देत आहेत.
तसेच त्यांची वरिष्ठा पर्यंत पोहोच असल्याने त्यांचे कुणी काही करू शकत नाही. अशी धमकी देत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तो आत्महत्या करीत असल्याचा मेसेज मयूर याने त्याच्या मित्रांना मोबाईलकर पाठविला. त्या नंतर एकच खळबळ उडाली. वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी मयुर राउतचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्या सर्वांनी कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलीस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप पर्यंत सदर कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार केज पोलीस ठाण्यात दिलेली नसल्याने अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडुन मिळाली आहे.
" मी राऊत यांना कोणतेही नियमबाह्य काम सांगितले नसून थकबाकी वसुली व गणवेश आदींची सक्ती म्हणजे जाच नाही; तर ते कर्मचाऱ्याचे नियमित कर्तव्य आहे."
--- आर. सी. अंबेकर,
उपकार्यकारी अभियंता, विज वितरण कं. कार्यालय, केज
-----------------------------------------------------------

