बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी जसे भारतीय संघाने ठरविले अगदी तसेच घडले. युएईत झालेल्या टि - ट्वेंटी विश्वचषकातील दारूण पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली. संघाचा पूर्ण चेहरा मोहराच बदलविण्यात आला. या दरम्यान कोहलीचे कसोटी कर्णधारपद सोडून सगळेच काही बदलले गेले. खेळाडूंच्या खऱ्या - खोट्या दुखापतींनीही वातावरणात रंग भरले. एवढी सगळी स्थित्यंतरे घडल्यानंतर त्याचे सकारात्मक पडसाद उमटणार हे निश्चितच होते. आश्चर्याची बाब म्हणजे जी नाणेफेक विरोधात गेल्यानंतर टि- ट्वेंटी विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आले होते तीच नाणेफेक न्यूझिलंड विरूध्दच्या टि- ट्वेंटी व कसोटी मालिकेत तसेच आफ्रिकेत बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या बाजूने फिदा झाली, आणि मग काय कानपूर कसोटी अनिर्णित राहीली हा अपवाद वगळता सर्वच सामने भारत जिंकले असून बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताने जो खेळ केला तो बघता या सामन्याचा निकाल भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता तशी कमीच दिसते.
संघातील गढूळ वातावरण व संघ निवड सर्वांच्याच चर्चेचा विषय होती. संघातील वातावरण तर बरे दिसले. मात्र अंतिम अकरा जणांचा संघ बघितल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडले. स्वतःच्या खेळात सातत्याचा अभाव असल्यामुळे नियमित उपकर्णधार असलेल्या अजिंक्य राहाणेला न्यूझिलंडविरुद्ध मुंबई कसोटीत संघातील स्थान गमवावे लागले होते. त्याच दौऱ्यात राहाणेच्याच नेतृत्वात खेळलेल्या कानपूर कसोटीत शतकी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरचा दावा बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्यासाठी अग्रणी होता, मात्र संघ प्रबंधनाने राहाणेचा अनुभव व परदेशातील त्याची मागील यशस्वी कामगिरी बघता पहिल्या कसोटीत त्याला झुकते माप दिले. यामुळे टिकाकार टिम मॅनेजमेंटवर जाम भडकले होते.
याच पार्श्वभूमिवर रोहीत शर्माच्या अनुपस्थितीत मंयक अग्रवाल व हंगामी उपकर्णधार के एल राहुल या कर्नाटकी मित्रांनी डावाची सुरूवात केली. विशेष बाब म्हणजे सन २०२१ या वर्षातील भारताची हि चौदावी सलामी जोडी आहे. यापूर्वी रोहीत शर्मा, लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा यांनी आलटून पालटून एकमेकांसह सलामीवीराची भूमिका बजावली आहे.
परदेशात भारताची सलामी फारसी यशस्वी झाल्याचे उदाहरणे फार कमी आहेत. मात्र राहुल व मयंकने इतिहासाला खोटे ठरवत नवा इतिहास घडवित एकशे सतरा धावांची सलामी दिली. मयंकने साठ धावांची झुंजार खेळी करत मुंबई कसोटीतील आपला फॉर्म कायम ठेवला व आपली निवड योग्य ठरवली. तर दुसरीकडे केएल राहुलने कसोटी खेळणाऱ्या ज्या देशात तो खेळला तेथे शतक ठोकण्याचा पराक्रम करताना भारताच्या डावाला दिवस आकार देत आकार सुरेख नाबाद १२२ धावा ठोकत संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले.
शतकी सलामीनंतर मयंक पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही आल्या पावली शुन्यावरच परतला. अजिंक्य राहाणे बरोबरच पुजाराचीही संघात निवड होऊ नये अशी अनेकांची इच्छा होती, परंतु टिम मॅनेजमेंटने त्याच्याही अनुभवाला प्राधान्य दिले. मात्र तो स्वतःला न्याय न देता संघाला संकटात सोडून परतला. मागील काही कसोट्यांचा पुजाराचा आलेख बघितला तर पहिल्या डावात तो सातत्याने फेल जातो व दुसऱ्या डावात थोड्याफार धावा काढतो. यामुळे त्याचे संघातील स्थान टिकून राहाते. मात्र संघाला संकटाचा सामना करावा लागतो. यावर पुजाराने वेळीच काम केले नाही तर त्याच्या ऐवजी येत्या काही दिवसात आपल्याला नवा फलंदाज संघात खेळताना दिसेल.
मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय शतक सातत्याने हुलकावणी देत असलेला कर्णधार कोहली सेंच्युरियनवर सेंच्युरी ठोकून टिकाकारांना चोख उत्तर देईल असे वाटत होते. मात्र चांगल्या सुरूवातीनंतर नेहमी करत असलेली चुक पुन्हा एकदा कोहलीकडून झाली व त्याच्यासह समस्त हितचिंतकांच्या आशांवर पाणी फिरले.
कोहलीच्या पतनानंतर बऱ्याच जणांना नकोसा झालेला अजिंक्य राहाणे मैदानात उतरला. पण यावेळी अजिंक्यचा अवतार जरा वेगळाच होता. सुरूवातीपासून आक्रमक व जबाबदारीने खेळत आठ चौकारांनिशी नाबाद चाळीस धावा ठोकून त्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढविलाच व संघाला विना पडझड सुस्थितीत नेऊन ठेवले. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियातील बॉक्सिंग डे कसोटीतील शतकानंतर त्याचा फॉर्म खराब झाला होता. मात्र यावेळी तो पूर्णपणे लयीत दिसत होता. आता याच खेळीला मोठया डावात रूपांतरीत केले तर त्याची उध्वस्त होऊ पाहणारी कारकिर्द सावरू शकते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

