शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
पुणे : शादी डॉट कॉम वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. ‘मी सैन्य दलात असून आपण लवकरच लग्न करु,’ असं आरोपी तरुणाने पीडित तरुणीला सांगितलं आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने तिचे लैंगिक शोषण करणं सुरु केलं. त्याला सिंहगड रोड पोलिसांनी अहमदनगर येथून बेड्या ठोकल्या आहे. आरोपीने पुणे, नगर, लातूरसारख्या शहरात अशाच पध्दतीने तरुणींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय 31 रा. कुंपटगिरी ता. खानापुर जि. बेळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनी साईटवर एका तरुणीची एका तरुणाशी ओळख झाली. तेव्हा त्याने मी सैन्यात असून तिला वर्दीतील फोटो देखील दाखविले. पुढे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी प्रशांत हा पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात सैन्याच्या वर्दीत आला.’
आपण नवीन आयुष्याची सुरुवात श्री दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेवुन सुरु करु, असे सांगत त्याने पीडित तरुणीचा विश्वास संपादित केला. त्यानंतर ड्रेस बदलण्याच्या बहाण्याने तिला मोटारीत बसवून नवले ब्रिज जवळील लॉजवर नेले. आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्याशी लढतो, असे बोलून भावनिक करुन तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने आरडाओरडा करु नये म्हणून त्याने पीडितेला सैन्य दलाच्या वर्दीची शपथ घातली. त्यानंतर तिला गाडीत बसवून कर्तव्यावर जायचे आहे, असे सांगून महिलेला शनिवारवाडा परिसरात सोडून पळ काढला. काही दिवसानंतर प्रशांत फोन उचलत नसल्याने महिलेला संशय आल्यामुळे तिने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली.
दरम्यान पीडितेने पोलिसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपी प्रशांत याला नगर येथून अटक केली. या प्रकरणानंतर मुंबई आणि लातूर येथून देखील काही प्रकरणसमोर आले असल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे. नेमकं आरोपीने किती तरुणींना गंडवलंय याचा तपास पोलीस करत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

