शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
चोरी झालेली मोटर सायकल परत मिळाल्यानंतर मालकाकडे सुपूर्त करताना मिरी येथील हनुमान तरुण मंडळाचे कार्यकर्ते. छाया: सचिन नन्नवरे)
मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील एका धार्मिक कार्यक्रमातून पहाटेच्या सुमारास मोटरसायकल चोरी गेल्याची व त्यानंतर सदर मोटरसायकल सकाळी सातच्या सुमारास युवकांच्या सतर्कतेमुळे परत मिळाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील नाथभक्त लक्ष्मण बापूराव झाडे यांच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी आलेले नाथभक्त आदिनाथ नवल यांची मोटारसायकल पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान चोरीस गेल्याचे लक्षात आले.त्यानंतर नवल यांनी सदर बाब पत्रकार सचिन नन्नवरे यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यामुळे ताबडतोब परिसरातील सर्व युवकांना एकत्रित करण्यात आले व संपूर्ण गावांमध्ये मोटरसायकलचा शोध घेण्यात आला.परंतु मोटरसायकल कुठेही आढळून आली नाही.यावेळी कानिफनाथ चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज देखील चेक करण्यात आले.परंतु त्यामध्ये देखील काही संशयास्पद आढळले नाही.
याचदरम्यान युवकांनी मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली असता त्याने या ठिकाणाहून थोड्या वेळापुर्वीच दोन इसमांनी एक मोटरसायकल ढकलत नेल्याचे सांगितले.त्यामुळे संशय आल्याने युवकांनी त्याच परिसरात असलेल्या हाडोळा भागातील काटेरी झुडुपांत मोटारसायकलचा शोध घेतला असता या ठिकाणी सदर मोटारसायकल उभी केलेली आढळून आली.
यावेळी मोटरसायकलच्या सर्व वायर तोडण्यात आल्या होत्या तसेच मोटरसायकल चालू करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.परंतु गाडी चालू न झाल्याने चोरट्यांनी सदर मोटरसायकल त्या ठिकाणी सोडून पोबारा केल्याचे लक्षात आले आहे. सदर चोरांनी ही मोटारसायकल पुन्हा येऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता परंतु युवकांच्या सतर्कतेने सदर मोटारसायकल परत मिळाली असून सकाळी सातच्या सुमारास ती संबंधित मालकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.त्यामुळे मोटरसायकलच्या मालकाने देखील या युवकांचे आभार मानले आहेत.
मोटरसायकल शोधण्यासाठी मिरी येथील हनुमान तरुण मंडळाचे कार्यकर्ते पत्रकार सचिन नन्नवरे,राहुल शिंदे,चेतन चव्हाण,अजय मरकड,गौतम गवळी,महेश चव्हाण,संभाजी वाघ,दीपक खोमणे,हर्षल शिंदे आदींनी सहकार्य केले.या युवकांचे परिसरातून कौतुक होत आहे.
बहुतांशी भाविक या कार्यक्रमासाठी जागी असताना देखील चोरट्यानी मोठे धाडस करून सदर मोटारसायकल गावाच्या बाहेर ढकलत नेऊन चोरीचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढविण्याची व गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

