shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत्रा/मोसंबी पिकातील कोळी व्यवस्थापन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१ 

 संत्रा/मोसंबी पिकातील कोळी व्यवस्थापन..!!

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात नगर, श्रीगोंदा, शेवगाव इत्यादी तालुक्यात मोसंबी/संत्रा पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, सद्य परिस्थितीत या पिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. इतर जिल्ह्यातील लिंबू वर्गीय बागेमध्ये देखील या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य त्या उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव पिकावर वर्षभर असला तरी जून ते ऑगस्ट दरम्यान जास्त असतो. परंतु सद्य परिस्थितीत तापमानामध्ये होणारी वाढ या किडीच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.
 

ओळख व नुकसान :-
कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते. प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात.

 

कोळी ही कीड पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळते व पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात व किडीचे अस्तित्व समजते. कधीकधी झाडावरील पिकणार्‍या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते. कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी ‘लाल्या’/खर्ड्या म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते.

 

या समस्येची तीव्रता पाहून कृषी विज्ञान केंद्र दहीगाव ने गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील करंजी व परिसरातील गावात कोळी कीड नियंत्रणासाठी प्रात्यक्षिके राबवत आहे. 

व्यवस्थापन :-
कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो. प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. जून ते ऑगस्ट या काळात बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत.
१.पाणी नियोजन योग्य पद्धतीने करावे, झाडास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

 
२. निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर १० ते १५ दिवसाचे अंतराने विद्राव्य गंधक ३ ग्रॅम किंवा इथिऑन २ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  
३.आवश्यकता भासल्यास तिसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी ओमाईट ४ ते ६ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे करावी.

श्री. लाखे माणिक
विषय विशेषज्ञ ( पिक सरंक्षण )
कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव ने, ता.शेवगाव, जि. अहमदनगर-४१४५०२
फोन नंबर- ९४२३००६६०७, ०२४२९-२७२०२०

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close