द्राक्ष बागायतदारांनी बदलत्या निसर्गाशी सामना करण्यासाठी भविष्यकाळात सज्ज राहावे - राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.जी.सोमकुंवर यांचे आव्हान.
इंदापूर प्रतिनिधी: बदलत्या निसर्गाशी सामना करण्यासाठी द्राक्ष बागायतदारांनी भविष्य काळामध्ये सज्ज राहण्याचे आवाहन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.जी.सोमकुंवर यांनी रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील अवकाळी मुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करताना तरंगवाडी येथे शेतकऱ्यांशी बोलताना केले.
ते पुढे म्हणाले की,पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पूर्वहंगामी द्राक्षे मोठ्या प्रमाणात घेतली जाते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या सुरुवातीस पडलेल्या पावसामुळे तोडणीसाठी आलेल्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भविष्य काळामध्ये अशा नुकसानी पासून बचावासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रावर विविध प्रयोग चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अजय शर्मा यांनी सध्याची परिस्थिती व तापमान पाहता उललेल्या द्राक्ष मण्यांच्या बेदाणा बनविण्यामध्ये मर्यादा असल्याचे बोलून दाखवले. परंतु इथून पुढचे स्वच्छ वातावरण व तापमान पाहता बेदाणा बनविण्यामध्ये अडचणी कमी होतील असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे श्री राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्ष बागायतदारांना धीर देऊन आलेल्या संकटाचा मुकाबला एकोप्याने करण्याचे सांगितले. ज्या बागायतदारांचे द्राक्षमणी उललेले आहेत व त्यामध्ये साखर भरली आहे अशा बागायतदारांनी बेदाना बनविण्याचे आवाहन त्यांनी केले व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र पुरविणार आहे. थोड्याच दिवसात इंदापुर मध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या सहकार्याने एक संस्था स्थापन करून द्राक्ष विक्री केंद्रही सुरू करणार आहोत.तसेच काळ्या द्राक्षापासून बेदाणा व द्राक्षरस प्रकल्पही थोड्याच दिवसात सुरू होणार आहे असे वाघमोडे यांनी सांगितले.

