निरोप ..
जुन्या वर्षा निघालास
किती केलेसं बेजार
आरंभ ते अंता पर्यंत
दिला कोरोना आजार
साधेपणाने सण सारे
विसरलो उत्सव वार
समारंभ न् कार्यक्रम
स्वागत सारे थंडगार
ढासळे अर्थ व्यवस्था
कंबरडे मोडलले पार
हतबलदुर्बल कामगार
हातचे गळले रोजगार
निसर्ग उगारी हत्यार
उग्र दहशती आकार
बळीराजा लढत राही
वाढले तितके विकार
लहान असो वा मोठा
कोसळून पडे बाजार
सामान्य असो वा बडा
झाले सगळेचं बेजार
लक्षात राही वीस वीस
झेललो अवघड प्रहार
अलविदा तव म्हणतो
मुळी मानली ना हार
नवीन वर्षा सुस्वागतम्
लवून तुजला नमस्कार
वेगळा हवासं तू यार
घडव काही चमत्कार
2)
पत्रकार...
पत्रकार दुधारी तलवार
करी मनावर थेट वार
अचूक भिडे काळजाला
लीलया पोचतो आरपार
सरस्वतीचा तो अवतार
साहित्याचा स्वर गांधार
नवरसांचा अमृत कलश
नटराजाचा साक्षात्कार
दीनदुबळ्याचा तारणहार
वेदना पुसतो तो हळूवार
आवाज मुक्याचा बनतो
शोषीतांचा तो आधार
जोडतो पाडतो सरकार
ठेवत नाही काही उधार
दहशत भिती कुठे त्याला
जीवावर सदैव उदार
नव युगाचा तो हुंकार
प्रगती उन्नती आविष्कार
स्वप्न उद्याचं उमलणारं
मोहक सुगंधी सुमनहार
लाखात एखादा चमत्कार
जणूं उत्सव दिपत्कार
समाजाला द्याया आकार
जन्मावा लागतो पत्रकार
3)
कॅलेंडर जुने ..
हसूं लागे भिंतीवर
कॅलेंडरआले नवीनं
दिन विशेष हर एक
वाचती सारे चवीनं
स्वागतां आले सारे
गेले केवढे हरकूनं
कॅलेंडर जुने होता
पाहे कोण फिरकून
मुहूर्त वेळ तिथीवार
माहिती रे पानोपानं
सांगे पानं फडकूनं
भूतभविष्य वर्तमानं
कथालेख वाचताना
हरवूनि जाते भान
जाहिराती चमकती
खेचूनि घेतात ध्यान
कॅलेंडर बिचारं जुनं
बसले रद्दीत जाऊन
कॅलेंडर मात्र नवीन
जाते भाव खाऊन
माणसाचे असेच हो
जाते सत्य शिकवून
दिसअसे नाविन्याचे
भोग जाते वाकवून
4)
शाई ..
मनामधल्या विचारा
व्यक्त करतेस बाई
पुरातन काळापासून
अति महत्वाची शाई
लेखणीतून झिरपते
अक्षरांची ती घडाई
अनमोल न् चिरंतन
रे साहित्यांची जुडाई
अभंगवाणी तव देणी
होशी रुकमा विठाई
बालकां गाणी गोष्टी
खिलवी मधूर मिठाई
झिंग आणी दंग करी
मद मस्त कधी सुराई
किती तरी उपकार ते
कशी होणार उतराई
बहु आयामी साहित्य
झालीस अगं आमराई
टिकाकार प्रगल्भ होई
भल्या भल्यांची धुलाई
लग्नपत्रिका शुभदायी
जुळवली कधी सगाई
सैनिका आप्त भेटवी
सुसह्य जराशी जुदाई
शुभेच्छा पत्र आनंदाने
दिली कित्येकां बधाई
नाते संबंधास गुंफुनिया
गं करशी सुंदर शिलाई
दुरूपयोग करी कुणी
अंगावर फेकूनि शाई
नवीन रुपडे हे शाईचे
सगळे हबकूनि जाई
मो.9730306996
www.kavyakusum.com

