शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१
राहुरी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात 85 गट आणि 170 गणांची रचना करण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात 85 गट आणि 170 गणांची रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार राहुरी तालुक्यातही एक गट नव्याने वाढणार असल्याने, हा गट कोणता असेल ? याविषयी उत्कंठा वाढलेली असतानाच, उंबरे गट हा नव्याने पुढे येण्याचे संकेत मिळत आहेत.
राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत. यामध्ये वांबोरी, ब्राम्हणी, टाकळीमिया, बारागाव नांदूर, सात्रळ गटांचा समावेश आहे. यामध्ये आता आणखी एक नवीन गटाचा समावेश होणार आहे. मात्र, हा गट कोणता असेल, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. नव्याने रचना करण्यात येणारा गट आणि भौगोलिक, लोकसंख्यांचा विचार करून घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सध्या 50 हजाराच्या पुढील गटाचे विभाजन करून त्यातून नव्या गटाची निर्मिती केली जाणार आहे. या सुत्रानुसार, वांबोरी गटाचे नाव चर्चेत येत आहे.
वांबोरी गटाच्या निवडणुकीत नेहमीच उंबरे गावातील राजकीय निर्णय निर्णायक ठरलेले आहेत. त्यामुळे वांबोरीकरांनाही उंबरेची डोकेदुखी होतीच, अनेक निवडणुकांत ती समोरही आलेली पहायला मिळाली. त्यामुळे उंबरे गट झाल्यास ‘वांबोरी’चा मोठा तिढा संपणार आहे. त्यामुळे उंबरे गटासाठी ‘वांबोरी’करही अनुकुल आहेत. याशिवाय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे उंबरेवर विशेष प्रेम आहे. उंबरे गणात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर वांबोरी गट मात्र अद्याप राष्ट्रवादीला कायमस्वरुपी काबीज करता आलेला नाही. त्यामुळे उंबरे गणाचे गटात रुपांतर झाल्यास राष्ट्रवादीचा गट वाढणार आहे. तर, दुसरीकडे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांच्यासाठीही उंबरे गट झाला तर सोयीचा ठरणार आहे. यातून, त्यांचे झेडपीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या उंबरे गट निर्मितीसाठी अनुकुल वातावरण आहे. कदाचित, राजकीय प्रयत्नांना यश आलेच तर, उंबरे गटाची निर्मिती करताना बारागाव नांदूर गटातील सडे, राहुरी खुर्द तसेच अन्य गावांचा या गटात समावेश होऊ शकतो. यातून, उंबरे गट तर उंबरे आणि राहुरी खुर्द असे दोन गण होऊ शकतात. शिवाय वांबोरी गटातून कुक्कडवेढे, चेडगाव आणि मोकळ ओहळ यांचाही समावेश उंबरे गटात करून वांबोरी गटातील लोकसंख्या ही उंबरे गटाप्रमाणे समान करता येणार आहे. त्यामुळे या गटाच्या निर्मितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

