जनता विकास मंडळ, राजुरी संचलित विद्या विकास मंदिर, राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे ) येथे मी 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मार्च 2005 या वर्षी मी दहावीची परीक्षा दिली त्याचा निकाल जून महिन्यात आला..! त्यावेळी जनता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे असिफभाई अध्यक्ष होते. स्व. जिजाभाऊ औटी सर उपाध्यक्ष होते. मुंबईस्थित प्रतिथयश उद्योगपती आदरणीय असिफभाई महालदार,,, (असिफभाईंची Reliance Fire Protection System या नावाने अग्निशमन संबंधित मोठ मोठी कामे करणारी कंपनी आहे,...; कंपनीचा टर्न ओव्हर काही कोटींमध्ये आहे,.. आणि त्यांची संपत्तीदेखील काही कोटींमध्ये आहे. त्यावेळी व आजही भारतीय उद्योगक्षेत्रात असिफभाईंचे विशेष नाव आणि आदरयुक्त दबदबा आहे. )
जून 2005 ला आमचा दहावीचा निकाल लागला आणि दहावीला मी शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो...; त्यावेळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत शाळेत पहिला येणे म्हणजे फार गौरवाची आणि कौतुकाची बाब होती...; त्याच निकालाच्या दिवशी जनता विकास मंडळाच्या संचालक मंडळाची मासिक सभा सुरू होती..; मी आनंदाच्या भरात सर्व संचालकांना पेढा देण्यासाठी मीटिंग हॉल मध्ये प्रवेश केला आणि सर्वांना पेढा दिला..; त्यावेळी सर्वांनी माझे विशेष असे कौतुक केले..!
पण असिफभाईंनी केलेलं कौतुक मी कधीहि विसरू शकत नाही...! असिफभाई म्हणाले की " नामदेव पवार हा आमच्या भावकीतील आहे आणि त्याने मिळविलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान आहे ". एवढे बोलल्यामुळे उपस्थितांनी प्रश्नार्थक नजरेने आणि आश्चर्यकारक मुद्रेने भुवया उंचावल्या..! कारणही तसेच होते. मी हिंदू धर्मातील वडार समाजाचा आणि ते मुस्लिम धर्मीय...; आणि मग ही भाऊबंदकी कशी काय...?? पुढे स्पष्टीकरणात असिफभाई म्हणाले "आमचे वाडवडील दगड फोडण्याचं काम करायचे (धोंडफोडु ) आणि नामदेव पवार देखील दगड फोडणाऱ्या वडार समाजातील आहे, आणि म्हणून ते माझ्या भावकीतील आहेत ". हे शब्द उच्चारल्यानंतर उपस्थितांसह माझेही डोळे अगदीच चमकले.. मी झोपडीत राहणारा गरीब घरचा मुलगा आणि हे एवढे मोठे उद्योगपती तरीही केवळ त्यांच्या वाडवडिलांनी दगड फोडण्याचे काम केले म्हणून माझ्याशी भावकीचे नाते सांगितल्यामुळे माझे नयन तरळले.
एखाद्या कोट्याधीश उद्योगपतीने अतिशय गरीब घरच्या मुलाला भावासारखे समजून मायेने भावकीच्या नात्याने बोलणे हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार होता...; पुढे काही महिन्यांनी राजुरी गावात झालेल्या सत्कार समारंभात "वडार वेदना" हे पुस्तक देऊन असिफभाईनी माझा उचित सन्मान केला. असिफ भाईंसारखी श्रीमंत तरीही विनम्र, विनयशील आणि हवेत न जाता जमिनीवर घट्ट पाय असणारी माणसे क्वचितच पाहायला मिळतात..!
या 15 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण येण्याचे कारण की दोनच दिवसांपूर्वी (दि.14 डिसेंबर 2021) असिफ भाईंच्या मुलाच्या दावत-ए- वलीमा ( Reception ) चा कार्यक्रम मुंबईतील डॉकयार्ड परिसरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बे व्हियू लॉन्स येथे पार पडला. त्या ठिकाणी मी निमंत्रित म्हणून उपस्थित होतो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चपदस्थ व अतिशय वजनदार व्यक्तिमत्वे उपस्थित होती. प्रशासनातील उच्चाधिकारीही उपस्थित होते. असिफ भाई प्रत्येक पाहुण्यांचे अतिशय विनयशीलतेने आणि विनम्रपणे स्वागत करत होते. भाईंच्या बोलण्यातील मृदुपणा, हळुवारपणा आजही जसाच्या तसाच आहे. कार्यक्रमात शंभरहून अधिक पक्वांन्ने आलेल्या पाहुण्यांसाठी बुफे पद्धतीने मेजवानी म्हणून उपलब्ध होती. आलिशान घर, गाड्या,ऑफिसेस असणाऱ्या असिफभाईंच्या चेहऱ्यावर मात्र कधीच गर्व वा अभिमान दिसत नाही.*
थोडा पैसा जरी आला तरी आपल्या माणसांना विसरणारी माणसे तर ढिगभर आहेत...; माणसाने कितीही मोठं झालं तरीही आपल्या माणसांना आणि वाडवडिलांनी केलेल्या कष्टाला कधीही विसरू नये याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे असिफभाई महालदार.....! पैसा, संपत्ती, मान, सन्मान येतो आणि जातो त्याचा कधीही गर्व करू नये... नाहीतर थोडी संपत्ती आणि पैसा आला की उर्मटपणे वागणाऱ्या माणसांची तर आपल्याकडे कमीच नाही.. परंतू दुर्दैवाने असिफभाईंसारखी सात्विक, शुद्ध आणि वास्तववादी विचार करणारी माणसे क्वचितच पाहायला मिळतात...; असिफभाई राजुरी गावच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होतात. राजुरी व मुंबई परिसरातील एक दानशूर व्यक्ती म्हणून असिफभाईंचा विशेष लौकिक आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असिफभाई नेहमीच कार्यरत असतात आणि गरीब, वंचित, उपेक्षितांना नेहमीच सढळ हाताने मदत करतात.
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री मा. नसीम खान साहेब असिफभाईंचे 4-5 वर्षांपूर्वी व्याही झालेले आहेत..! आजही असिफभाई हे प्रतिथयश उद्योजक आहेत..; त्यांच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आलेख वाढतच आहे...;आजही त्यांचे बोलणे मृदू, सौम्य, हळुवार आणि निगर्वी आहे.. कारण त्यांचे पाय जमिनीवर आहेत...;जीवनात यश मिळविणाऱ्या सेलिब्रिटी आणि उद्योजकांनी असिफभाईंचा विनम्रता, विनयशीलता आणि दानशूरपणा हे गुण आत्मसात करावेत हीच अपेक्षा आणि त्यासाठीच हा लेखप्रपंच.
धन्यवाद !!!
🙏🙏🙏🙏🙏
नामदेवराज पवार
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता


