शनिवार दिनांक २६ डिसेंबर पासून भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरीयन पार्क येथे पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. नाताळाच्या दुसऱ्या दिवशी जो पाच दिवसीय कसोटी सामना सुरु होतो त्या सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट असे संबोधले जाते. तसं बघाल तर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच व मुष्टीयुध्दाचा काही एक संबंध नाही. या बॉक्सिंग डे शब्दाला एक ऐतिहासिक वलय असून नाताळाच्या सणा निमित्त दुसऱ्या दिवशी मित्र मंडळी, नातेवाईक, वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने व इतर उद्योग व्यवसायांचे मालक आपल्या कामगारांना तथा कर्मचाऱ्यांना एका खोक्यात घालून भेटवस्तू देतात. नेमके त्याच दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हंटले जाते, आणि त्या दिवशी खेळले जाणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट असे संबोधतात. तसे बघाल तर बॉक्सिंग डे संदर्भात अनेक अख्यायिका आहेत.
पूर्वीच्या काळी बॉक्सिंग डे कसोटी फक्त ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्येच खेळली जायची. आता मात्र ती दक्षिण आफ्रिका व न्यूझिलंड या देशातही खेळली जाते. या वर्षी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात एशेस मालिकेतला तिसरा कसोटी मेलबोर्न व भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे बॉक्सिंग डे कसोटीचे स्थान मागील बऱ्याच दिवसांपासून या दोनही देशात मेलबोर्न व सेंच्युरियन हे कायम असते.
बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे २६ डिसेंबरला होणारा कसोटी सामना. सन १९५० पासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला प्रारंभ झाला असल्याची अधिकृतपणे सुरुवात झाल्याची नोंद आहे. सन १९५०-५१ मध्ये एशेस मालिकेत प्रथम बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला. वास्तविक तो सामना २२ डिसेंबरला सुरू झाला होता व २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे साजरा करण्यात आला होता. सन १९५३ ते १९६७ च्या दरम्यान काळात २६ डिसेंबरच्या दिवशी कोणताही कसोटी सामना खेळविण्यात आला नव्हता. त्यानंतर सन १९७४-७५ च्या एशेस मालिकेतला तिसरा सामना २६ डिसेंबरला सुरू झाला व बॉक्सिंग डे कसोटीला नवसंजिवनी मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर सन १९८० पासून नियमितपणे दरवर्षी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विरूध्द पाहुणा संघ यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळली जाते. याला सन १९८९ हे वर्ष मात्र अपवाद होते. त्या वर्षी बॉक्सिंग डेेला कसोटी सामना न होता श्रीलंकेविरूध्द ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामना खेळला होता.
भारत आतापर्यंत इंग्लंड, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. भारताने खेळलेल्या एकूण चौदा बॉक्सिंग डे सामन्यांपैकी केवळ तीन सामने जिंकले असून नऊ हारले तर दोन अनिर्णित राहिले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेत सन १९९२, १९९६, २००६, २०१० व २०१३ ला बॉक्सिंग डे कसोटी खेळले असून या पाच पैकी चार सामन्यात भारत पराभूत झाले असून बाकीचे चारही सामने भारताने गमावले आहेत. सन २०१८ व २०२० च्या ऑस्ट्रेलियात खेळलेले बॉक्सिंग डे कसोटी सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारताला यावेळी दक्षिण आफ्रिकेला हरवून बॉक्सिंग डे कसोटी विजयाची नामी संधी भारताला चालून आली आहे.
सन २०१० नंतर भारताची बॉक्सिंग डे कसोटीतील कामगिरी सुधारली असल्याचे दिसते. मात्र एकंदर आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताची कामगिरी असमाधानकारक असल्याचेच चित्र आहे. कागदावर प्रबळ दिसणारी भारतीय फलंदाजी सेना देशांत हिरव्यागार खेळपट्टीवर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळल्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले असल्याने भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची शंभर टक्के अपेक्षा ठेवणे काहीसे गैरच आहे. तरीही आशेवरच जग जगत आले असल्याने आपण भारतीय फलंदाजांना शुभेच्छा देऊन चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू, कारण भारताच्या गोलंदाजांपेक्षा फलंदाजांच्या कामगिरीवरच या दौऱ्यात टिम इंडियाचे भवितव्य अवलंबून आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

