शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:
मुंबई–नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी २०२२ पासून मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई या मार्गाने ती चालेल. या मुळे दोन्ही शहरांमधील अंतर आणि वेळ ७५ टक्क्यांनी कमी होणार आहे. म्हणजेच मुंबईहून नवी मुंबईला तुम्ही अवघ्या 15 मिनिटांत पोहोचू शकता. यापूर्वी ही जलमार्ग सेवा मार्च 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती त्यावेळी सुरू होऊ शकली नाही.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार. यावेळी पंतप्रधान मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील केमिकल टर्मिनलचे उद्घाटन करणार असल्याचेही बोलले जात आहे. ही टॅक्सी सेवा चालवण्याचा परवाना इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपी आणि वेस्ट कोस्ट मरीन या दोन खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे.
वॉटर टॅक्सी मुंबई ते एलिफंटा आणि जेएनपीटी 15 मिनिटात आणि मुंबई ते बेलापूर, नेरुळ, वाशी आणि रेवस असा 25-30 मिनिटांत प्रवास करेल. हा मार्ग माझगावच्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलपासून सुरू होऊन बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, रेवस (अलिबागजवळ), जेएनपीटी, करंजाडे आणि माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या एलिफंटा लेणी येथे संपेल.
इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसकडे चार जहाजांचा ताफा आहे. 50-सीटर, 40-सीटर, 32-सीटर आणि एक 14-सीटर वॉटर टॅक्सी आहेत, तर वेस्ट कोस्ट मरीनमध्ये दोन 12-सीटर आणि एक 20-सीटर जहाज आहे. इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल कजानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वॉटर टॅक्सी धावतील. सुरुवातीला ती दिवसातून तीन वेळा सकाळ संध्याकाळ आणि दुपारी धावेल. मागणी जास्त असल्यास, दर 30 मिनिटांनी ऑपरेट होईल.
मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीचे भाडे प्रति प्रवासी रु. 1,000 ते रु. 1,200 दरम्यान असण्याची शक्यता आहे, तर JNPT आणि एलिफंटाचे भाडे रु. 750 असण्याची शक्यता आहे. भाडे खूपच जास्त आहे, परंतु प्रवाशांची संख्या वाढल्यास हे दर कमी होतील. सहकारी संस्थे द्वारा चालवल्या जाणाऱ्या वॉटर टॅक्सींचे तिकीट 350 रुपये असण्याची शक्यता आहे.

