shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गांवगुडी राजकारणाने अनेक घरे उध्वस्त- दत्ता कडू पाटील..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
देवळाली प्रवरा : माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांच्या फेसबुक सदरातील गावगाडा मध्ये आज गावगुंडी आणि कर्मफळ यावर लिखाण केले आहे, त्यामध्ये ते लिहताना ते म्हणतात की, गांवगाडा नियमित सुरु झाला. आज सकाळीच एक नवी समस्या समोर आली. गांवातील एका युवकाला काल दुपारपासुन एका प्रकरणात उलटसुलट जवाब देण्यासाठी काही तरुणांनी रसपान करुन फितविण्याचा प्रयत्न केला गेला... तो दुपारपासुन गायब न् रात्री घरि न आल्याने विधवा आई चिंतेत. त्यांनी संपर्क साधला, त्या मुलांसोबत असलेली मुले चांगल्या घरातील. मुलाची मिसींग तक्रार करावी तर ती मुले अडकणार. शेवटी त्या मुलांचे पालकांना संपर्क करुन समजुतीने विषय संपला. तो गायब मुलगाहि मिळाला. शेवटी जिथे सापडायचा तिथे सापडला.  
 
     गांवातील मुले व्यसनाधीन झाली असुन व्यसनापायी ते काहीहि करायला तयार होतात.हे हेरुन यांचा वापर केला जातो आहे. व्यसन असणे तेहि प्रमाणात आपण समजु शकतो. तो कमावता असेल त्यापैकी काही मजा करत उडवले तर हरकत नाही. परंतु कामधंदा सोडुन कुणाचे भोंगे फुंकत फिरायचे. रात्री कोंबडीचा एक लेगपीस म्हणजे, पाय न् घोटभर दारुसाठी कोणतेहि काम करणारी तरुणाई पाहिली कि वाईट वाटते. पालकांचे आटोक्याबाहेर हि मुले गेली आहेत. तो कुणासोबत रहातो. काय पितो काय खातो. काही न कमावता एकदम छानछौकीत रहातो. याची जरा उलटपासणी करत जा. हे पांढरे डगलेवाले पोरांना कसे कामाला लावतात, हे आम्हीहि अनुभवले आहे. घरात एक दारुडा तयार करायचा. भाऊंबंदाना बांदावर झुलवत ठेवत. एकमेंकाची डोके फोडायला लावयाची. पुन्हा साळसुदपणे मिटवायला यायचे. ह्या गांवगुडी राजकारणाने अनेक घरे उध्वस्त झाली. हा सावकाशीचा विषप्रयोग अनेंकांचा बळी घेवुन गेल्याचे आपण पाहिले आहे. तेंव्हा आपली मुले सांभाळा न् आपले कुटुंबियहि.
      जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत जा हे गीतेचे वचन. या सगळ्या गोष्टीवर चिंतन केले कि तुम्ही करत असलेले नित्यकर्म तुम्हांला तुमची जीवन यात्रा कशी असावी हे ठरवत असते .कर्म चांगले कि वाईट हे परिस्थितीनुरुप ठरते. चोरी ज्याचे घरी झाली त्याला ती तोट्याची असते.परंतु चोरी करणा-याचे घरि मात्र अनायसे श्रम न करता घबाड मिळाल्याचा आनंद असतो. तुम्ही वाममार्गाने संपत्ती कमावता त्यातुन ऐश्वर्य भोगतां अश्यावेळी सरळमार्गी माणुसहि जरावेळ चरफडतो. आपले प्रामाणीकपणाला काही किमंत आहे कि नाही असे त्याला वाटु लागते. ख-याची दुनिया नाही असेहि तो बोलतो. एक मात्र नक्की.. 'झगमगाटमागे वाईट कर्म दडलेले असते' हे त्रीकाल सत्य आहे. There is always crime behind glory. 
           तुम्ही काय आहात. तुम्ही चांगले कृत्य करता कि वाईट.हे सगळ्यांत जास्त माहित असते ते तुमचे तुम्हांला. तुम्ही एखादे वाईट कृत्य केले त्यामुळे कुणाचे वाईट झाले. तर तो तुमच्याशी सशक्त असेल तर थेट पंगा घेईल. परंतु तो दुर्बल असेल तर तो मनात चरफडत रहातो. परंतु मनातुन त्याने दिलेले शाप ,तळतळाट , हाय हे कधी ना कधी तुमच्या मार्गात अडसर बनतात. त्रास झालेली व्यक्ती कदाचित बोलणार नाही. परंतु बोलण्यापेक्षाहि तिच्या शरीरातून बाहेर पडणारी तुमच्यासाठीची नकारात्मक उर्जा तुम्हांला एक ना एक दिवस तुमच्या कर्माचे भोग भोगायला लावतेच . एका टप्प्यावर गेल्यावर मागे वळुन पाहिले तर आपण काय केले याचा पश्चाताप होत असतो. कदाचित या पश्चातापाने तुमचे पापक्षालन होईलहि परंतु कुणाचा तळतळाट तुम्हांला नेहमी बोचत अस्वस्थ ठेवत असतो. 
       लांडीलबाडी करुन मिळवलेली संपत्ती, भूलथापा देवुन मिळवलेली प्रतीष्ठा खुप तकलादु असते. ती क्षणात संपते. तुमचे होत्याचे नव्हते होवुन जाते. अश्या वाईट प्रवृत्तीचे तुणतुणे वाजविणारे झिलकरी हेहि तितकेच दोषी असतात. नकळत ते वाईट व्यक्तीला समर्थन देत त्याचे उदात्तीकरण करत असतात.त्याचे पापाच्या फळाची चवहि त्यांना काही प्रमाणात चाखायला मिळते. परंतु ते मात्र विसरतात पापाची फळे खाण्यास गोड न् पचण्यास जड असतात. तुम्ही धन्याची चाकरी कर्म म्हणुन करत असतात. परंतु ते कर्म नेमके काय आहे याची उमज तुम्हांला नसेलहि. परंतु नामानिराळे रहात तुमचा धनी तुमच्या खांद्याचा वापर करत समोरच्यावर निशाणा साधतो. त्या पापाचे धनी तुम्ही ठरत असता. कारण जगाचे नजरेत पाणी तुम्ही असता ना कि पाताळयंत्री धनी.  
         सरळ न् साधं जगा. कुणाचे वाईट चिंतु नका. कुणाचा तळतळाट लागणार नाही असे कर्म करत जा. नाही कुणाचे भले करता आले तर वाईटहि करु नका. केवळ वाईट कर्म तुम्हांला नुकसान पोहचवत नाही तर तुमचे कटु व कडवट बोल समोरच्याचे जिव्हारी लागतात.कुणालाहि कमी लेखु नका. जो तो आपल्याजागी योग्य न् श्रेष्ठ असतो. कुणाचे पायात पाय घालु नका उलट मदतीचा हात गाळात फसलेल्या द्या, त्यात पुण्य लाभते. त्यासाठी पुजाअर्चा , तिर्थयात्रा न् दानधर्म करायची गरज नसते. वरुन जरी तुमची पांढरी सफेदी चमकत असेल परंतु अंतरंगात काजळी आलेली असते. तुमचे कर्म तुम्हांला रात्री शांत झोप येवु देत असेल तर तुम्ही जगातील सर्वात सुखी प्राणी. म्हणुन चांगले कर्म करा.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close