शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१
राज्यातील विवाह सोहळ्यास आणि इतर कार्यक्रमास निर्बंध लागणार..!!
करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त 50 जणांनाच परवानगी असेल.
31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. तसेच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, करोना कृती दलाचे डॉ़ संजय ओक, डॉ़ शशांक जोशी, डॉ़ अजित देसाई, डॉ़ राहुल पंडित आदी उपस्थित होते.
सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. अलीकडे राज्यात विवाहसोहळे मोठय़ा दिमाखात आणि गर्दीत साजरे होत आहेत. त्यातूनच संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले.यामुळे विवाह सोहळय़ांतील गर्दी रोखण्यावर भर देण्यात आला आहे. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल.
राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

