येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टि२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे तर त्यानंतर फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये भारतात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक होणार आहे. या दोन्ही स्पर्धा अगदी जवळ आल्यामुळे त्यांच्या तयारीच्या दृष्टीने त्यात सहभागी होणारे सर्वच संघ आपापल्या परिने तयारीला लागले आहेत. त्याच तयारी अंतर्गग भारत व वेस्ट इंडिज यांच्यात प्रत्येकी तीन वनडे व तीन टि२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
येत्या ६ फेबुवारीपासून वनडे मालिकेला सुरूवात होत असून दुसरा सामना ९ व तिसरा सामना ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथेच होणार आहे. तर १६, १८ व २० फेब्रुवारी रोजी टि२० सामने कोलकाता येथे होणार आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोनच मैदानांवर सामने घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
ऑक्टोबर -नोव्हेंबर २०२१ मध्ये भारताच्याच संयोजनात युएईत झालेल्या टि२० विश्वचषक स्पर्धेत भारत व विंडीज या माजी विजेत्यांची कामगिरी अतिशय गचाळ झाली होती. या दोन्ही संघांना कागदोपत्री प्रबळ असूनही उपान्त्य फेरीही गाठता न आल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते.
या अनपेक्षित पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल झाले. मुख्य प्रशिक्षक,, सपोर्टींग स्टाफ, तीनही प्रारूपातील संघांचे कर्णधार बदलण्यात आले. निकामी व अनफिट खेळाडू संघाबाहेर गेले. काही नवोदित संघात आले. मात्र या नंतर भारतात न्यूझिलंडविरुद्ध झालेली टि२० व कसोटी मालिका जिंकून भारताने आपली पत सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टिम इंडियाच्या इज्जतीचा फालुदा झाला. सुरुवातीला आघाडीवर असतानाही कसोटी मालिका गमावली. त्यानंतर वनडे मालिकेत सपाटून मार खाल्ला.
कसोटी मालिकेतील पराभवानंतर नियमीत कर्णधार कोहलीने कर्णधारपद सोडले. कोहली व बीसीसीआय यांच्यातील संबंध दूषित झाले. त्यामुळे कळत न कळत संघाच्या कामगिरीवरही त्याचा दुष्परिणाम झाला. वनडे व टि २०चा नियमित कर्णधार रोहीत शर्मा दुखापतीमुळे दौऱ्यावर जाऊ शकल्याने संघाला मोठा फटका बसला. तर अनुभवी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, रविचंद्रन आश्वीन, भुवनेश्वर कुमार यांचे अपयश संघाला त्रासदायक ठरले.
या सर्व पार्श्वभूमिवर भारतात होऊ घातलेल्या वेस्ट इंडिज विरूध्दच्या मालिकेत संघात घाऊक बदल होणार हे उघडच होते आणि झालेही तसेच. रोहीत शर्मा पुर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याने तो संघात परतला आहे. तर डावखुरा जलदगती गोलंदाज आवेश खान, लेगस्पिनर रवि बिश्नोई हे नवे चेहरे संघात आले तर कुलदिप यादव वरही विश्वास दाखविण्यात आला आहे. बाकी संघ अपेक्षेप्रमाणे असून आयपीएल, सय्यद मुश्ताक अली चषक, विजय हजारे स्पर्धा व देशांतर्गत इतर स्पर्धातही भरघोस कामगिरी करून धावांचे रतीब ओतणारा पृथ्वी शॉ नेमका कुठे हरवला ? त्याला का डावलले जात असून त्याच्या सध्याच्या फॉर्मचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे अन्यथा पृथ्वी शॉ सारख्या होतकरू खेळाडूची कारकिर्द धोक्यात येऊ शकते.
त्याचप्रमाणे ऋतुराज गायकवाड हा भारतातील आजच्या घडीला सर्वोत्तम नवोदित खेळाडूला संघात निवडूनही खेळविले जात नाही. यामुळे त्याच्यातील उमेद कोमेजून जाऊ शकते. त्यामुळे किमान या दौऱ्यात तरी त्याला वॉटरबॉय न बनवता वंडर बॉय बनण्याची संधी द्रविड व रोहीत यांनी द्यावी.
याचबरोबर विंडीजनेही आपला वनडे संघ जाहीर केला असून अनुभवी जलदगती गोलंदाज केमार रोच, एनक्रुमाह बोनर व ब्रेंडन किंग यांना बऱ्याच दिवसांनी पुन्हा पाचारण केले आहे.
वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ असा असेल...
किरॉन पोलार्ड (कप्तान), फॅबियन एलेन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वाल्श जूनियर.
याच बरोबरोबर भारताचा वनडे संघ पुढील प्रमाणे आहे....
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), ऋतराज गायकवाड़, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिपक चहार, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा वआवेश खान.
तसेच टि२० साठी भारताने निवडलेला संघ या प्रमाणे आहे. ..
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दिपक चहार, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान व हर्षल पटेल.
संघात निवडलेल्या या खेळाडूंचे नावं कागदावर भारदस्त दिसतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना अंतिम अकरा जणात निवडताना कोणते राजनिती काम करते यावरच संघाच्या यशाचे गणित अवलंबन आहे. आशा आहे की यापुढे तरी केवळ देशहिताचेच निर्णय घेतले जातील.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

