मकर संक्रांतीचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुःखदायक ठरला. मागील तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याच्या आशांनाही सुरूंग लागला. त्याचबरोबर कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वात गुणतालिकेत भारतीय संघाची मोठी पिछेहाट झाली असून या वेळी अंतिम फेरी गाठणे अवघड होऊन बसले आहे.
तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने विनासायास विजयी लक्ष पार करून मालिकेतला पहिला सामना गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारत २-१ ने मालिका जिंकली. याच बरोबर गुणतालिकेत भारताला मागे सारत चौथे स्थान पटकविले. दक्षिण आफ्रिकेचा संघ वरकरणी दुबळा दिसत होता. शिवाय एनरिच नॉर्खिया सारखा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला. शिवाय पहिल्या कसोटीनंतर यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने अकाली निवृत्ती घेतली. त्याचबरोबर संघात अनेक नवे चेहरे असल्याने व त्यांचा कसोटींचा अनुभव अल्प असल्यामुळे कसोटीतील आसीसीची नंबर एक रँकींग प्राप्त भारतासमोर त्यांना कोणी किंमतही द्यायला तयार नव्हते. त्यातच पहिल्या कसोटीत दिड दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने त्यांचाही आत्मविश्वास ठेचला होता.
परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत दक्षिण आफ्रिकन संघाने आपल्या जवळील मर्यादित का होईना उपलब्ध गुणवत्तेचा योग्य समन्वय साधत प्रथम आपल्या कच्च्या दुव्यांवर व्यवस्थित काम केले. आपले मुख्य अस्त्र असलेल्या वेगवान गोलंदाजीचा चांगल्या प्रकारे वापर केला. तसेच आपल्या सवयीच्या वातावरणाचा व खेळपट्टयांचा अचूक लाभ उठवत प्रतिपक्षाची कमकुवत बाजू असलेल्या मोठया नावांच्या फलंदाजांच्या बारीक बारीक नांग्या ठेचल्या, आणि मग त्याचा व्हायचा तोच परिणाम आता आपल्यासमोर सिध्द झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेला खास करून त्यांच्या फलंदाजीला कमी लेखण्याची चुक भारताला चांगलीच महागात पडली. अगदी नवख्या छोटया चणीचा किगन पिटरसन एकटाच भारताला भारी पडला. यासाठी कारणीभूत ठरला तो भारताचा अतिउत्साही यष्टीरक्षक रिषभ पंत. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात हाच पिटरसन अवघ्या बारा धावांवर खेळत असताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजारा कडे सरळ चाललेल्या झेलाला पंतने विनाकारण छेडले. त्यानंतर पिटरसनने ६२ धावा ठोकल्या, दोन दमदार भागीदाऱ्या केल्या व संघाला सदृढ स्थितीत नेले. त्यानंतर पिटरसनने मागे वळून बघीतलेच नाही व तिसऱ्या सामन्यात सामनावीर व मालिकावीराचा किताब पटकविला.
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कर्णधार डिन एलगरने दमदार नाबाद ९६ फटकावून आपल्या संघाला मालिकेत बरोबरीवर आणले. पिटरसन, एलगर यांच्या शिवाय टेंबा बवुमाने देखील अफलातून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांच्या शिडातली हवाच काढून घेतली.
कागिसो रबाडाने या मालिकेत भरपूर नोबॉल टाकले. परंतु महत्वाच्या क्षणी भारतीय फलंदाजांना बाद करून स्वतःचे कार्य व्यवस्थित पार पाडले, लुंगी एंगिडी व डुआन ऑलिव्हर यांनीही धारदार गोलंदाजी केली. मात्र या मध्ये उठून दिसला तो ६ फूट ८ इंच उंचीचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेनसन ! आपली पहिलीच मालिका खेळणाऱ्या जेनसनने १९ बळी घेताना सतत भारतीय फलंदाजांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून त्यांना सातत्याने त्रस्त ठेवले. याचा फायदा त्याला व दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाने मिळाला. या दौऱ्याची पिटरसन व जेनसन ही दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी कमाई ठरली आहे.
तसे बघाल तर दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेण्याची फार मोठी किंमत भारतीय संघाला मोजावी लागली. या मालिकेत भारताची फलंदाजी फार मोठी डोकेदुखी ठरली. खास करून चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणेने मोठी निराशा केली. तर केएल राहुल व मयंक अग्रवाल आघाडीवर अपयशी ठरल्याने संघाच्या अडचणी वाढल्या. कर्णधार कोहलीची शंकास्पद पाठदुखी व फलंदाजीतील हरवलेली लय भारताच्या पराभवाला जबाबदार आहे. तर रिषभ पंत शेवटचा डाव वगळता गचाळच खेळला.
फिरकी गोलंदाजांना या खेळपट्ट्यांवर विशेष काहीच साह्य नसल्याने आश्वीन निष्प्रभ ठरला. तर मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर व जसप्रित बुमहाराने एकेकदा वैयक्तिक चांगली कामगिरी केली मात्र संघातील सर्वच गोलंदाजाकडून एकाच वेळी सांघिक कामगिरी न झाल्याने मालिकेत मोठा पराभव झाला. मोहम्मद सिराजचे दुखापत ग्रस्त होणे संघाच्या अडचणीत भर पाडणारेच ठरले.
या दौऱ्यात भारताचे क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ झाले. त्यामुळे पराभवाला आणखी एक कारण मिळाले. कोहली व राहुलचे नेतृत्वही प्रभावी नसणे हे देखील पराभवाला निमंत्रण देणारेच होते. शिवाय कर्णधार कोहली व बीसीसीआय यांच्यात बिनसलेले संबंध संघाच्या एकोप्यास तडा देणारेच ठरले. भारतीय खेळाडूंचे वर्तन, पंचाच्या निर्णयावर उघड प्रतिक्रिया देणे संघाच्या इभ्रतीला शोभेसे नव्हतेच. या दौऱ्यात मालिका हरणे, संथ षटकगतीमुळे गुण कटणे, गुणतालिकेत पिछेहाट होणे म्हणजेच हा दौरा अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. आता १९ जानेवारी पासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत असून भारताचे दिवटे काय दिवे लावतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

