भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग कसोटीत भारताला यजमान संघाने अनपेक्षितरित्या धुळ चारल्यानंतर टिम इंडियाचे समर्थक कमालीचे निराश झाले असून त्यांच्या भावनांचा उद्रेक संपूर्ण देशभर बघायला व ऐकायला मिळाला. यामध्ये माजी क्रिकेटपटू, क्रिकेट पंडित, पत्रकार, युटयूब चॅनेल्स, प्रसारमाध्यमे व भारतीय संघाच्या अनेक चाहात्यांचा समावेश आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत लोकेश राहुलने वॉन्डरर्सवर भारताचे नेतृत्व केले. कसोटीत नेतृत्व करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यातला कर्णधार म्हणून राहुलकडे बघितले जाते. मात्र त्याला आयपीएल मध्ये पंजाब किंग्जचे नेत्तृत्व करण्याचा अनुभव आहे. मात्र तेथेही त्याची कामगिरी ठणठण गोपाळ अशीच आहे. सहा महिन्यांपूर्वी भारताचा संघ इंग्लंडला गेला तेंव्हा त्याचे भारताच्या संघात स्थानही पक्के नव्हते. पण त्याच्या आधी नियमीत सलामीवीर असलेले शुभमन गिल व मयंक अग्रवाल जखमी झाल्याने त्याची लॉटरी लागली. त्या संधीचा त्याने अचूक फायदा उठवत एक शतक व दोन अर्धशतके ठोकत रोहीत शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या धावा बनविल्या व त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये ६२६ धावा ठोकल्या. परंतु त्याचा पंजाब संघ त्याच्याच नेतृत्वात साखळीतच गारद झाला होता.
टि-२० विश्वचषकात भारताची कामगिरी अतिशय खराब झाली. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठीच उलथापालथ झाली. विराट कोहलीचे मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व गेले. त्याऐवजी रोहीत शर्मा कर्णधार बनला तर फलंदाजीत इतर फलंदाजांपेक्षा सरस कामगिरी असल्याने राहुलला उपकर्णधार करण्यात आले. त्या दरम्यान खराब फॉर्ममुळे कसोटीचा नियमित उपकर्णधार अजिंक्य राहाणेचे पद काढून घेण्यात आले. त्याच्या ऐवजी रोहीत शर्माला कसोटीचे उपकर्णधारपद मिळाले. परंतु दुर्देवाने दक्षिण आफ्रिकेला संघ रवाना होण्यापूर्वी रोहीत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने राहुलचे नशिब फळफळले व त्याला वनडेचे कर्णधारपद व कसोटीचे उपकर्णधारपद मिळाले.
भारताच्या दुर्देवाने व राहुलच्या सुदैवाने दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीचे पाठीचे दुखणे वाढल्याने तोही संघाबाहेर गेला. त्याच्या ऐवजी राहुलला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याने शतक ठोकले होते. तर दुसऱ्या डावात अपयशी ठरला होता. परंतु सामना भारताने जिंकल्याने तो सामनावीर ठरला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पन्नास धावा जोडल्या खऱ्या पण संघाची पडझड चालू असताना तोही एक बेजबाबदार फटका मारून बाद झाला. शिवाय कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षण लावण्यात त्याने अतिशय गंभिर चुका केल्या, त्यामुळे दुसऱ्या डावात डिन एल्गरला एकेरी धावा काढण्याची मोठीच संधी मिळाली व बघता बघता त्याने भारताच्या हातातून विजय ओढून नेला. राहुलचे गोलंदाजीतील बदलही अनाकलनीय होते. शिवाय दुसऱ्या डावात संघाला गरज असताना त्याचे केवळ आठ धावांवर बाद होणे संघासाठी मारक ठरले.
संघाचे दोन प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे पहिल्या डावात लागोपाठच्या चेंडूवर अनुक्रमे तीन व शुन्य धावांवर बाद झाल्याने संघाच्या धावांना ब्रेक लागले. दुसऱ्या डावात या दोघांनी एकशे अकरा धावांची भागीदारी करून अनुक्रमे त्रेपन्न व अठ्ठावन्न धावा अक्षरशः ठोकल्या. मात्र त्यांचे पाठोपाठ बाद झाल्यानंतर रिषभ पंतही चुकीचा फटका मारून बाद झाला. त्यामुळे भारत दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे लक्ष ठेवू शकले नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात किगन पिटरसनचा बारा धावांवर रिषभ पंतने सोपा झेल सोडला होता. त्यानंतर पिटरसनने बासष्ठ धावांची खेळी करत संघाला भारतावर आघाडी मिळवून देण्यात मदत केली. रिषभ पंत सध्या टिकाकारांच्या रडारवर असून त्यालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे.
चेतेश्वर पुजारा मागील अनेक दिवसापासून सातत्याने अपयशी ठरत आहे. संघातून काढण्याची वेळ आल्यावर तो एखादी लक्षवेधक खेळी करून वेळ धकवून नेतो. यावेळेसही त्याने तसेच केले. मात्र टिकाकार त्याच्यावर जाम भडकले असून त्याच्या अपयशाचा राग अजिंक्य राहाणेवर काढला जात आहे.
वास्तविक अजिंक्य राहाणेच्या खेळातही सातत्य नाही. मात्र चेतेश्वर पुजारा इतका तो अपयशी नाही. डब्ल्यूटीसीच्या पहिल्या पर्वात भारतातर्फे राहाणेचच्या सर्वाधिक धावा होत्या. त्यामुळेच भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. तर या मालिकेत पहिल्या कसोटीत दुसऱ्या क्रमांकाच्या धावाही त्याच्याच होत्या. शिवाय दुसऱ्या कसोटीत शुन्यावर बाद झाला असला तरी सामन्यात त्यानेच सर्वाधिक धावा काढल्या आहेत. इतकेच नाही तर दुसऱ्या डावात महत्वाच्या क्षणी त्याने पुजारासह शतकी भागीदारी केली. ती जर त्याने केली नसती तर भारत तिसऱ्याच दिवशी पराभूत झाले असते. मात्र पराभवाने रागावलेले भारतीय समर्थक सर्वात जास्त जाम भडकले आहेत.
खरे बघाल तर यात अजिंक्य राहाणेची काही एक चुक नाही. शिवाय राहुल नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या धावा त्याच्याच आहेत. मात्र सध्या तो विनाकारण भरडला जात आहे. भारताविरूद्ध मागील अनेक दिवसात इतक्या मोठया धावांचा पाठलाग करून कोणताही संघ जिंकला नसल्याने टिकाकार जाम भडकले आहेत. मात्र दुसऱ्या डावात गोलंदाजांना पोषक असलेल्या वातावरण खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज सफसेल फेल गेले याकडे मात्र टिकाकार कानडोळा करताना आढळले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

