shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियाचे पराभवाचे ग्रहण सुटेना ; यशाची गुरूकिल्लीही सापडेना..!


             दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय संघाला एखाद्या दुःखद स्वप्नासारखा जात आहे. पहिला कसोटी सामना वगळता प्रत्येक सामन्यात टिम इंडियाच्या पदरी पराभवच पडत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचं नुसतं नाव घेतलं तरी समोरचा संघ थरथर कापायचा. मात्र आजमितीला दुय्यम दर्जाचा दक्षिण आफ्रिकेचा संघही खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताला भारी पडताना दिसत आहे, आणि भारताचा संघ कोणतीही झुंज न देता मैदानात केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. माजी कर्णधार कोहली व बीसीसीआय यांच्यातील तणावानंतर संपूर्ण संघाच्या खेळावरच नाही तर मानसिकतेवरही परिणाम झाल्याचे विदारक दृश्य सध्या बघायला मिळत आहे.


                पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाज ढेपाळले होते तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फलंदाज अडखळले तर गोलंदाजांना नेमकं काय करायचं हेच समजत नव्हतं.
कसोटी मालिके पाठोपाठ वनडे मालिकाही गमवावे लागलेल्या भारतीय संघाला आता अर्थहिन झालेला तिसरा वनडे सामना केवळ औपचारिकता म्हणूनच खेळावा लागणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात पराभवाचे ठळक कारणं काय होते यावर आपण येथे एक नजर टाकणार आहोत.

                  विराट कोहली सध्या विचित्र मानसिक स्थितीतून जात आहे. त्याचे खेळावर लक्ष नसल्याचे त्याच्या देहबोलीवरून जाणवत आहे. एरव्ही मैदानावर एका उत्साह मुर्ति सारखा वावर असणारा कोहली मागील दोन्ही सामन्यात फ्यूज उडालेल्या बल्ब सारखा भासत असून धड बॅटनेही संघासाठी भरीव कामगिरी करत नाही ना धड कर्णधाराला बिकट परिस्थितीत कोणताही सल्ला दिसत नाही. चैतन्य हरवलेला कोहली सध्या संघासाठी असून अडचण नसून खोळंबा असल्यागत वाटत आहे. त्याचे शुन्यावर बाद होणे याच गोष्टीचे लक्षण आहे.

                 भारताची मधली फळी सध्या शापीत असल्या सारखी भासत आहे. भले वनडे असो वा कसोटी तेथे कोणताही फलंदाज असो तो फेल होणार हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे. आघाडीचे फलंदाज आपले कर्तव्य बजावतात पण मधल्या फळीतीतील फलंदाज त्यावर पाणी सोडतात. मग ते कोहली -राहाणे -पुजारा असोत की आता वनडेत कोहली - श्रेयस - व्यंकटेश अय्यर हे अपयशी ठरणार हे आता पक्के झाले आहे. कसोटीत शतकी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर दोन्ही सामन्यात फेल गेला त्यामुळे त्याच्या बरोबर संघही अडचणीत येत आहे. तीच बाब व्यंकटेश अय्यरची झाली आहे. त्याच्याकडून अपेक्षित असलेली खेळी होत नसल्याने भ्रमनिरास झाला आहे.

                या सामन्यात रिषभ पंतने ८५ धावांची खेळी करून स्वतःची इज्जत राखली खरी पण संघाला धावांची आणखी गरज असताना बेजबाबदार फटका मारून बाद झाला. यष्टीरक्षणात प्रत्येक सामन्यात त्याची चूक भारताला महागात जात असून या सामन्यात पंतने क्विंटन डिकॉकला स्टंपिग करण्याची सोपी संधी दवडून भारताच्या अडचणीत भरच घातली. यष्टीमागे अचूक कामगिरी करणाऱ्या निष्णात यष्टीरक्षकाची गरज असून पंत सारख्या आडवे तिडवे फटके मारून कधीतरी धावा बनविणाऱ्या खेळाडूची गरज नाही. पंतचे अतिलाड करणारे व त्याला संघात घेणारेच या पराभवांना कारण ठरत आहेत. 

                 भारताचे आघाडीचे गोलंदाज संपूर्णपणे निष्प्रभ ठरत असल्याने दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर डिकॉक व मलान यांनी १३२ धावांची सलामी दिली. त्यांची जोडी फोडायला बावीसाव्या षटकाची वाट पाहावी लागली. यातच गोलंदाजांच्या अपयशाची कहाणी दडली आहे. खास करून भुवनेश्वर कुमारचे अपयश डोळ्यात खुपत आहे. आता तरी त्याला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. बुमराहाची धारही पहिल्या सारखी दिसत नाही.

                  एकीकडे तबरेज शम्सी, केशव महाराज व कामचलाऊ फिरकी गोलंदाज मार्करम हे भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणत असताना भारताचे तथाकथीत जागतिक दर्जाचे स्पिनर्स आर आश्वीन व यजुवेंद्र चहल आफ्रिकन फलंदाजांसमोर हतबल झालेले दिसले, आणि विशेष म्हणजे तेही दिल्ली सारख्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ! यावरून गोलंदाजांच्याही मानसिकतेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसते.

                  हंगामी कर्णधार के एल राहुलच्या रणनितीवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तो कर्णधार पदाच्या बिलकुल लायकीचा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. अष्टपैलू खेळाडू व सहावा गोलंदाज म्हणून संघात घेतलेल्या व्यंकटेश अय्यरला चोवीसाव्या षटकात गोलंदाजी देणे हे देखील समजण्या पलीकडचे आहे. यावर आणखी मोठा कहर म्हणजे मोठया प्रयत्नानंतर सलामी जोडी फोडणाऱ्या शार्दूल ठाकूरला बळी घेतल्यानंतर गोलंदाजी न देणे अशी चुक राहुलच करू शकतो. क्षेत्ररक्षण लावणे, गरजे प्रमाणे गोलंदाजीत बदल करणे या छोटया गोष्टी देखील राहुलला समजत नाहीत. ह्या बाबी संघाच्या पराभवाच्या मुख्य कारणांपैकी आहेत.

                 संघाच्या यशाची गुरूकिल्ली हाती असलेले नवे गुरू राहुल द्रविड यांच्याकडून जादूच्या कांडीची गरज असताना त्यांचाही प्रभाव या दौऱ्यात न जाणवल्याने मागील पाच वर्षातला सर्वात वाईट परदेश दौरा असे वर्णन या दौऱ्याचे करावे लागेल. आता राहुल द्रविडला येथून पुढे यशाची खरी गुरुकिल्ली हाती असलेल्या नियमित कर्णधार रोहीत शर्माची संघात फिट होऊन परतण्याची वाट बघावी लागणार आहे हे तितकेच खरे आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close