पर्यावरण जनजागरण (१२०)
त्यागातून समाधान, समाधानातून रोगप्रतिकारशक्ती
आरोग्य साक्षरता हा विषय लक्षात घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवावी याबाबत मी डॉक्टर मित्रांशी चर्चा करत होतो. माझ्या बोलण्याचा विषय असा होता की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये मनाची शक्ती फार महत्त्वाची आहे.
डॉक्टर मित्राचे म्हणणे असे होते की औषधांची शक्ती जास्त महत्वाची असते, यात मनाचे काही घेणे देणे नाही. मी त्याला असे म्हटले की, दवाखान्यात अनेक प्रकारचे रुग्ण असतात त्यामुळे अनेक प्रकारची काळजी घेतली जाते. अनेक डॉक्टर मंडळी असतात, अनेक वाॅर्ड बाॅय, नर्सेस देखील असतात. डॉक्टर मंडळी वेळोवेळी काळजी घेऊ शकतात. महागडी औषधे घेऊन आपला बचाव करतात. वर्ल्ड बाॅयला,नर्सेसना एवढा खर्च परवडतो का? तरीदेखील, अगदी साथीच्या रोगात देखील हॉस्पिटलमधील कामगार सेवा देत असतात. मग त्यांना सरसकट आजार का होत नाहीत?
आमच्या डॉक्टर मित्राने थांबून विचार केला व म्हटले की ते त्या वातावरणात रुळलेले असतात, त्यांच्या मनामध्ये सेवेचा भाव असतो, अत्यंत मन लावून हॉस्पिटल मधील कामगार सेवा देतात हे मान्य करावेच लागेल. अशी चर्चा करताना शेवटी आमच्या डॉक्टर मित्राने स्वत:च मान्य केले ही काम करताना मनात परोपकार असेल, स्वार्थाची भावना नसेल तेव्हा रोगप्रतिकारशक्ती खूपच वाढलेली असते.
थोडक्यात सांगायचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नि:स्वार्थी सेवा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो आचरणातून आणि संस्कारातून प्राप्त होतो. स्वार्थ सांभाळला की मनाला क्लेश होतात. शरीरामध्ये विघातक स्पंदने तयार होतात. त्यातून रोगप्रतिकारशक्ती कमी होते. निःस्वार्थी परोपकार याचे दुसरे नाव त्याग असे आहे. त्यागाने समाधान मिळते आणि समाधानातून आरोग्य प्राप्त होते असे संतवचन आहे.
वरील विचार समजून घ्या व आपल्या मित्र परिवाराला समजावून सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण आरोग्य जनजागरण मोहिमेत सहभागी व्हा.
लेखक :
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने देशभक्तकोशकार, पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५

