shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिडनीत सलग दुसऱ्यांदा विजयाने दिली ऑस्ट्रेलियाला हुलकावणी !


           सिडनी हे ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर. याच सिडनी मध्ये एससीजी म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राउंड असून येथे यजमान कांगारूंचं रेकॉर्ड अतिशय सुंदर आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून या मैदानावर झालेल्या दोन कसोटयात या मैदानावर ऑस्ट्रेलियाला वाईट अनुभव आले आहेत. सामन्याच्या पाचही दिवसांवर त्यांचे बऱ्यापैकी नियंत्रण असते. विजय त्यांच्या अगदी पुढयात आलेला असतो. मात्र शेवटच्या क्षणी असे काही घडून जाते की समोरचा संघ करिश्माई खेळ करून गळ्यात पडू पाहणारा पराभवाचा हार बाजूला सारून सन्मानजनकरित्या स्वतःला पराभवाच्या विळख्यातून बाजूला सारून स्वतःची शान राखत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवतो व विजयाची प्रतिक्षा करत असलेले ऑस्ट्रेलियन कपाळावर हात मारून आपल्याच चुका शोधत बसतो.

           सिडनीत दोन वर्षात भारत व नंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजय अक्षरशः ओरबाडून घेतला. विशेष म्हणजे दोन्ही वेळा सामन्यातच नव्हे तर मालिकेतही ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम होती. तरीही ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध गोलंदाज प्रतिप्रक्षाला सर्व बाद करण्यात कमी पडले.
           सन २०२१ च्या जानेवारीच्या पाहिल्याच आठवडयात सिडनीमध्ये नव्या वर्षातला पहिला कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०० धावांचे लक्ष ठेवले, मात्र भारताच्या फलंदाजांनी जिवाचे रान करून १३१ षटके खेळून काढले व शंभर टक्के हरलेला सामना वाचविला. सामना भले अनिर्णित राहीला पण तो भारताचा नैतिक विजयच होता.

          एशेस मालिकेत सलग तीन कसोटी जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या चौथ्या सामन्यातही संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व होते. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चौथ्या डावात ३८८ धावांचे आव्हान दिले. पुर्ण मालिकेत पानिपत झालेल्या इंग्लंडसाठी हे आव्हान अतिशय कठिण होते. मात्र इंग्लंडनेही भारता प्रमाणेच जिगरबाज खेळ करत १०२ षटके खेळून काढताना आपला शेवटचा गडी काही कांगारूंच्या हाती लागू दिला नाही व सामना वाचवून इज्जतही राखली.
          खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचे ठोके चुकविणाऱ्या दोन्ही लढतींचा थोडक्यात आढावा आपल्यासाठी सादर करत आहे. सन २०२१ मध्ये ४०० धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारताने शुभमन गिल व रोहीत शर्माचे बळी गमावले होते, तर पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच कर्णधार अंजिक्य राहाणे दुसऱ्याच षटकात केवळ चार धावांवरच बाद झाला होता. तरीही भारताने आपली रणनिती बदलली नाही. 
            त्यानंतर रिषभ पंतने आक्रमक खेळ करत ११८ चेंडूत बारा चौकार व तीन षटकारांसह ९७ धावा ठोकल्या व चेतेश्वर पुज़ारा (२०५ चेंडूत ७७ धावा ) याच्यासह १४८ धावांची भागीदारी करत भारताचे आव्हान कायम ठेवले. मात्र पंत पाठोपाठ पुजाराही बाद झाला तेव्हा भारताच्या ५ बाद २७२ धावा फलकावर होत्या आणि आर आश्विन व हनुमान विहारी जखमी होते. त्यांना धड उभेही राहाता येत नव्हते व मोठे फटकेही खेळता येत नव्हते. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या दोघांनाही उसळत्या चेंडूचा मारा करून जंग जंग पछाडलं होते. तरीही दोघांनी तब्बल ४६ षटके निडर होत खेळून काढले व ऑस्ट्रेलियाच्या मुखातला विजयी घास हिसकावून नेला व सामना अनिर्णित राखला.
            
            सन २०२२ ची सिडनी कसोटीही असाच रोमांच घेऊन अनिर्णितावस्थेत संपली. ३८८ धावांचे लक्ष असलेल्या इंग्लंडचे हमीद व मलान ७४ धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतर जॅक क्राऊली ७७ व रूट २४ धावांवर बाद झाले. तर बेन स्टोक्स १२३ चेंडूत धावा बनविल्या. जो जोस बटलर ३८ चेंडूत ११ धावांवर बाद झाले. मार्क वुडच्या रूपात सातवा बळी गेला.  सामन्याचे बारा षटके शिल्लक असताना १०५ चेंडूत ४१ धावा काढून महत्वाचा फलंदाज जॉनी बॅरियस्टोही बाद झाल्यानंतर जॅक लिचने ३४ चेंडूत २६ धावा केल्यानंतर बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडसह लिचने आठ षटके खेळून काढले. लिच नवव्या गडयाच्या रूपात बाद झाला.
               शेवटचे दोन षटके खेळून काढण्याची जबाबदारी अनुभवी गोलंदाज ख्रिस ब्रॉड व जेम्स अँडरसन यांच्यावर होती. अशा वेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेवात आले होते. फिरकी गोलंदाज नाथन लायनने टाकलेले १०१ वे शतक ब्रॉडने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे टिच्चून बचावात्मकरित्या खेळून काढले. तर शेवटचे षटक स्टिव्हन स्मिथने टाकले, ते अँडरसनने सुरक्षात्मक पध्दतीने खेळून काढले व सामना आरामात वाचविला व कांगारूना आपल्या रणनितीवर विचार करण्यास भाग पाडले.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close