भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना केपटाऊन येथील न्युलँडस मैदानावर सुरू झाला. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. सलग तिसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने गेला. मात्र पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी जसा खेळ केला तसा नंतर एकदाही दिसला नाही. त्याचे नुकसान वाँडरर्स कसोटीतील पराभवाने संघाला सोसावे लागले होते. त्या चुकांमधून भारतीय फलंदाज काही बोध घेतील अशी अपेक्षा असताना भारतीय फलंदाजांनी त्याच तिकीटावर तोच शो करून संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणलेच शिवाय काही जणांच्या कारकिर्दीवर यंदाची संक्रांत येणार हे आता पक्के झाले आहे.
सध्या सुगीचे दिवस अनुभवत असलेला के.एल राहुल एक शतक व एक अर्धशतक वगळता उरलेल्या तीन डावांत सफसेल अपयशी ठरला. तर दुसरा सलामीवीर मयंक अग्रवाल भारतीय खेळपट्टयांवर जी दादागिरी करतो ती परदेशात करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तिसऱ्या क्रमांकावर येणारा चेतेश्वर पुजारा स्वतःची कारकिर्द संकटात आहे हेच टेंशन घेऊन खेळताना दिसला. त्याच्या टिपीकल खेळाच्या विपरीत आक्रमक खेळ करण्याच्या नादात चांगली सुरुवात होऊनही मोठा डाव खेळण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या पुढील भवितव्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पुजारा प्रमाणेच अजिंक्य राहाणेची अवस्था झाली असून त्यानेही दोन चौकार ठोकून दणक्यात सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा त्याचे फेल होणे संघाबरोबरच त्याच्याही करिअरला धोक्यात घेऊन गेले. मागच्या डावात शानदार अर्धशतक केल्यानंतर तो फॉर्ममध्ये आला असे वाटत असताना परत एकदा त्याच्या खेळात सातत्याचा अभाव दिसला. एका चांगल्या खेळीनंतर पुढच्या डावात तोच टेंपो कायम ठेवण्यात अजिंक्य का कमी पडतो ? हे फार मोठे कोडे बनले आहे. अजिंक्यचा खेळ व अनुभव बघता संघ प्रबंधन त्याची सातत्याने समर्थन करत आहे. मात्र आता अजिंक्यची घटका भरली असे वाटते.
पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीत न खेळलेला कर्णधार विराट कोहली संघात परतला. त्याच्या समोर संघाची पडझड सुरू असताना तो कमालीचा संथ खेळत होता. हे त्याच्या लौकिकाला साजेशे नव्हते. परंतु त्याच्या ७९ धावांनी संघाला जेमतेम सव्वादोनशेच्या घरात नेऊन ठेवले. तसे बघाल तर पुजारा व राहाणे प्रमाणे त्याचाही फॉर्म व्यवस्थित नाही. त्यामुळे तोही दबावात असल्यामुळे त्याच्याकडून अतिशय शांत खेळ झाला. एकंदर त्याचा डाव बघितला तर तो संघ हिताचा नक्कीच आहे, परंतु त्यामध्ये टिकाकारांना शांत करण्यासाठी केलेली आत्मसन्मान जपणारी खेळी केल्याचाच भास होतो.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने २७ धावा केल्या खऱ्या परंतु खेळपट्टीवर उभे राहून संघासाठी मोठी खेळी करण्यात तोही अपयशी ठरला. आश्विनची बॅट यावेळी मौन दिसली. तर शार्दूल ठाकूरचा प्रत्येकी एक षटकार व चौकार वगळता डाव लवकर आटोपला. शमी, बुमराहा यांची बॅट यावेळी कमाल करू शकली नाही तर उमेश नाबाद परतला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सुरुवात केली मात्र मागच्या कसोटीतील त्यांच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार डिन एल्गर स्वस्तात परतल्याने भारताला आपल्या अपयशी फलंदाजी नंतर मोठा आनंद मिळाला असेल. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांवर मोठी भिस्त असणार असून त्यांच्या कामगिरीवरच या सामन्याचे व पर्यायाने भारताचे येथे प्रथम कसोटी मालिका जिंकण्याचे भवितव्य अवलंबून आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

