शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १२ डिसेंबर २०२२
अहमदनगर ब्रेकिंग:१३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक..!!
अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम एच १३ सीयू ८४८९ ही बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने
बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.दुसऱ्या घटनेत एम एच १४ बिटी २४६० वैजापूर-कोपरगाव
ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. मात्र एक किलोमीटर अंतरावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी बसवर दगडफेक केली.
यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते. दगडफेकीमुळे काचा बसच्या आत पडल्याने प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत.
या हल्ल्यात प्रवासी सुखरूप असून चालकाच्या डोळ्यात काचेचे बारीक तुकडे गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने
आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. मात्र या घटनेने कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

