अंबासाखरचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
आगामी काळात अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून चालविण्यात येणार आहे. मी स्वतः केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून सर्वच पक्ष व संघटनांच्या व्यक्तींना संचालक पदावर काम करण्याची संधी देणार आहे. ही जुनी ऐतिहासिक वास्तु मराठवाड्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणे बंद पडु नये साठी आपण हा निर्णय घेतला असल्याची घोषणा अंबासाखरचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी केली.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ शुक्रवारी दुपारी झाला. यावेळी ऊस उत्पादक सभासदांशी संवाद साधताना कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर, ह.भ.प. लालासाहेब पवार, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, अंबासाखरचे उपाध्यक्ष हनुमंत मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा संचालक प्रमोद जाधव, बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदूलाल काकडे, भाजपाचे मा. अध्यक्ष तानाजीराव देशमुख, संचालक अॅड. प्रमोद जाधव, प्रा. वसंत चव्हाण, कार्यकारी संचालक सुरेश साखरे, अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख, केजचे बाजार समितीचे सभापती लक्ष्मीकांत लाड, माजी नगराध्यक्ष शेषेरावजी फावडे, धारूर बाजार समितीचे सभापती सुनिल शिनगारे, केज पंचायत समितीचे सभापती विष्णु घुले, केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषीकेश आडसकर, अंबाजोगाई न.प.माजी उपाध्यक्ष बबनराव लोमटे, भाजपाचे नगरसेवक अनंतराव लोमटे, सुरेश कराड, भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राउत, बबनबप्पा सोळंके, हनुमंत कदम, डॉ. तिडके, वडवणी भाजपा अध्यक्ष पोपट शेंडगे, अशोकराव गोंडे, दगडु साहेब शिंदे, अनंत पाटील, विलास सोनवणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रमेश आडसकर म्हणाले की, अंबासाखरच्या उभारणीसाठी स्व.बाबुरावजी आडसकर, स्व.डी. एन. पाटील, स्व. भगवानराव लोमटे, स्व. अॅड. आनंदराव चव्हाण, स्व. शीवाजीराव पाटील यांच्यासह अनेक जेष्ठांचे मोठे योगदान आहे. बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्याची कार्यक्षेत्र असणारा हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याचा मोठा इतिहास आहे. ही ऐतिहसिक वास्तु आगामी काळातही सुस्थितीत राहिली पाहिजे. यासाठी आता राजकारण बाजूला ठेवून भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब, आ. नमिताताई मुंदडा, आ. संजयभाऊ दौड, राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे व विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून हा साखर कारखाना आपण चालविणार आहोत. साखर कारखाना चालविताना आगामी काळात कारखान्याचा अध्यक्ष न राहता. केवळ मार्गदर्शकाची भूमिका माझी राहील व सर्व पक्षीय संचालक मंडळ साखर कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घेईल. राजकारण विरहीत साखर कारखाना चालविण्याचा हा नवा प्रयोग आपण सहकारात अंमलात आणणार आहोत. यासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येवून हा साखर कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे व गेल्या पंधरा वर्षात सर्व संचालकांनी आम्हा आडसकर कुटूंबाला प्रेमदिले त्या सर्व संचालकांचे मी आभार मानतो. असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले.
तीन वेळा अवसायनात निघालेला हा अंबासाखर कारखाना गेल्या 15 वर्षापासुन सुरु आहे. सहकारी बँकेचे 70 कोटी रुपयांचे कर्ज साखर कारखान्याने फेडले आहे. मात्र शिखर बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे आर्थिक पुरवठा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी आल्या मात्र अशा अडचणीतही विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून साखर कारखाना सुरूच आहे. महाराष्ट्रातील अंबासाखरच्या सोबतचे अनेक साखर कारखाने बंद पडले. इतकेच नाही तर मराठवाड्यातील ढोकी, किल्लारी, नळेगाव, सांगली, बीड, कडा, परभणी असे अनेक साखर कारखाने बंद पडले. मात्र अंबासाखर सुरू ठेवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे हा साखर कारखाना सुरू राहिला. आता आगामी काळात ही ऐतिहासिक वास्तु अशीच सुरु राहिले पाहिजे यासाठी सहकारात राजकारण नको ही भूमिका मी घेतली आहे. आणि ही भूमिका वास्तवात आणून ही ऐतिहासिक वास्तु पुन्हा नव्या जोमाने कशी सुरू राहिली यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आडसकर यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, परिसरातील शेतकऱ्यांना अंबासाखर हा एकमेव आधार आहे. ही ऐतिहासिक वास्तु आगामी काळातही सुरू रहावी यासाठी पिपल्स बँक आर्थिक सहाय्य करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी सांगितले. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर, राजेसाहेब देशमुख, अच्युत गंगणे यांची भाषणे झाली. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर, ह.भ.प.लालासाहेब नाना पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबासाखरचे कार्यकारी संचालक सुरेश साखरे यांनी केले. संचालन प्रेमचंद पवार यांनी तर उपस्थितांचे आभार मारुती सोळंके यांनी केले.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याकडे कर्मचारी, ऊस उत्पादक, वाहन धारक, व्यापारी, अथवा विविध संस्थांचे आर्थिक देणे आहेत. तर यासाठी साखर कारखाना पुढील तीन वर्ष सुरळीत चालला तर सर्वांचे देणी देता येतील. ही भूमिका आता सर्वानीच घेणे गरजेचे आहे साखर कारखाना सुरळीत सुरु झाल्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. ज्या प्रमाणे शिखर बँकेचे 70 कोटी रुपये साखर कारखान्याने फेडले. त्याच धर्तीवर अतिरिक्त देणे ही दिले जातील. अशी ग्वाही यावेळी रमेश आडसकर यांनी दिली.
आगामी होणाऱ्या संचालक मंडळाची निवडणुक लढवणार नाही
आगामी काळात अंबासाखर ची होणाऱ्या निवडणुकीत आपण स्वतः संचालक मंडळाची निवडणूक लढवणार नाहीत.मात्र मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याचे रमेशराव आडसकर यांनी यावेळी सांगितले.

