भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याकरिता कसोटी मालिकेसाठी नियुक्त उपकर्णधार रोहीत शर्मा हॅमस्ट्रींगची दुखापत उदभवल्याने कसोटी दौऱ्यावर जाऊ शकला नाही. विशेष म्हणजे याच दौऱ्यावर होऊ घातलेल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रोहीत शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. मात्र त्याची दुखापत बऱ्याच अंशी गंभीर असल्याने त्याला वनडे मालिकेसाठीही विश्रांती देण्याचा महत्वाचा निर्णय निवड समितीने घेतला. त्याचे मुख्य कारण म्हणजे या वर्षी टिट्वेंटीचा विश्वकरंडक होणार असून व अजूनही काही महत्वाच्या स्पर्धा होणार असल्याने रोहीतचे पूर्णपणे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे.
आपणास माहितीच आहे की टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहलीने भारताचे कर्णधारपद सोडले होते. त्याला पर्याय म्हणून निवड समितीने रोहीतला टिट्वेंटी संघाचा कर्णधार बनविले. शिवाय वनडे व टि ट्वेंटी संघाची रचना व रणनिती जवळपास सारखीच असल्याने त्या प्रकारात एकच कर्णधार असावा जेणे करून संघाच्या धोरणात व आचरणात एकजूटता असावी. त्यामुळे निवड समितीने विराटकडून वनडे नेतृत्व काढून रोहितला दिले आणि त्यानंतर बरेच मोठे रामायण घडले.
बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने जाहीर केले होते की, त्यांनी स्वतः विराटला टि ट्वेंटीचे नेतृत्व सोडू नकोस असे सांगितले होते. मात्र त्यानंतर स्वतः विराटने दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, त्याला कोणीही टि-ट्वेंटीचे कर्णधारपद सोडण्यास रोखले नव्हते. शिवाय वनडेचे नेतृत्व काढून घेण्यापूर्वी त्याला विश्वासातही घेतले नव्हते.
त्यानंतर समस्त क्रिकेट जगतात मोठीच खळबळ उडाली होती. विराटच्या वक्तव्यानंतर सर्वच जणांनी बीसीसीआयला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले. विराटला जगभरातून सहानुभूती वाढली होती. त्यातच बीसीसीआयकडून कोणतेच स्पष्टीकरण न आल्यामुळे वातावरण आणखीच संभ्रमित झाले होते व बीसीसीआय दोषी असल्याची भावना पसरली होती. खास करून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे खलनायक म्हणून बघितले जात होते.
या दरम्यान काही विघ्नसंतोषी लोकांनी कोहली रोहीतच्या नेतृत्वात वनडे मालिकेत खेळणार नसल्याच्या अफवा उठविल्या तर काही महाभागांनी रोहीतची दुखापत एक नाटक असून त्याला कोहलीच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळायची नाही म्हणून बीसीसीआयच्या संगनमताने बहाणा केल्याचे चित्र रंगविले. तसेच मध्यंतरी रोहीत फिट असल्याच्या बातम्याही फैलावल्या जायच्या.
या दरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला गेला. पहिल्या कसोटीत भारताने यजमान संघाला पराभूत करत मालिकेत आघाडीही घेतली. संघाचे दौऱ्यावरील मनोबल घसरू नये म्हणून कादाचित बीसीसीआयने कोहलीला प्रत्युत्तर दिले नसावे. शेवटी बंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकाडमीत पुनर्वसन प्रक्रिया पुर्ण करत असलेला रोहीत अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचा अधिकृत अहवाल निवड समितीला प्राप्त झाल्यानंतर वनडे संघाची घोषणा केली. या संघाचा हंगामी कर्णधार म्हणून केएल राहुलची तर उपकर्णधारपदी जसप्रित बुमराहाची निवड केली. यामुळे रोहीतच्या दुखापतीवरून उठलेले वादळ मिटले. मात्र त्यानंतर झालेल्या निवड समिती अध्यक्ष चेतन शर्माच्या पत्रकार परिषदेनंतर वेगळेच वादळ उठले.
चेतन शर्मा यांनी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला रोखठोक उत्तरं देताना स्पष्ट केलं की, निवड समितीतील प्रत्येक सदस्याने कोहलीला टि-२० चे नेतृत्व न सोडण्याची विनंती केली होती. तसेच वनडेचे नेतृत्व काढण्यापूर्वी त्यांनी स्वतः त्याला फोनवर सुचित केले होते. चेतन शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर आता स्पष्ट झाले आहे की विराट कोहली खोटं बोलत आहे.
सध्या तरी बीसीसीआयकडून कोहलीविरूध्द शिस्तभंगाच्या कारवाईचे कुठलेही संकेत मिळाले नसले तरी शक्तीशाली बीसीसीआय कोहलीला योग्य वेळी सबक शिकविल्या शिवाय राहणार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

