शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२
विमानतळापर्यंत जिवंत पोहचलो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; मोदी संतापले..!!
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब भागात रॅली घेणार होते. मात्र त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते.
दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि सुरक्षेचं आश्वासन दिलेलं असतानाही इतकी मोठी घोडचूक झाल्याने भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
यादरम्यान एका वृत्तसंस्थेशी बोलतांना बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे पीएम मोदी खूप संतापले आहेत. सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, त्यांच्या ‘मुख्यमंत्र्यांचे आभार, मी विमानतळावर जिवंत परत येऊ शकलो’.
नेमकं काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले त्यानंतर त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता.
त्यानंतर डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना 15 ते 20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावं लागलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.
गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही.
दरम्यान सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

