shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दक्षिण आफ्रिकेचा पलटवार भारताची ऐतिहासिक हार..!

       वॉन्डरर्सवर नयनरम्य इतिहास असलेल्या टिम इंडियाचे येथे ऐतिहासिक चमत्कार घडविण्याचे स्वप्न चक्काचूर करताना यजमान दक्षिण आफ्रिकेनेच नव्या इतिहासाचा पहिला अध्याय लिहीला, आणि या सुवर्ण क्षणाचा शिल्पकार होता दस्तुरखुद्द दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिन एल्गर ! शब्दशः आघाडीवर राहून प्रतिपक्षाचे जीवघेणे आव्हान अक्षरशः आपल्या अंगावर झेलत कर्णधार एल्गरने या प्रतिष्ठेच्या सामन्यात नाबाद ९६ धावांची झुंजार खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका साकारताना मालिका बरोबरीत आणली व पुढच्या सामन्यात लढण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमध्ये नवचैतन्यही निर्माण केले.

              
सामन्याच्या चौथ्या दिवशी केवळ एकशे बावीस धावांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेसमोर होते मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पहिले दोन सत्र वाया गेले व पाचव्या दिवशीही पावसाचेच वर्चस्व राहाण्याचा अंदाज असल्याने  विजय हातून जातो कि काय असे वाटत होते. मात्र चहापानानंतर खेळ झाला आणि आफ्रिकन फलंदाजांनी मिळेल त्या संधीचे धावात रूपांतर करत विजयाला गवसणी घातली. या दरम्यान त्यांनी संघाची पडझड होणार नाही याची दक्षता घेत अवघा एकच गडी गमावला.

             
झालेला पाऊस व ढगाळ हवामानाचा लाभ भारतीय जलदगती गोलंदाज उठवतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु मोहम्मद शमीने ड्युसेनचा घेतलेला एकमेव बळी वगळता भारतीय गोलंदाज साफ निष्प्रभ ठरले. एकीकडे विरोधी संघाचे वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत असताना जगातील सर्वात प्रभावशाली वेगवान गोलंदाजांचा ताफा असलेला भारतीय मारा सफसेल अपयशी ठरल्याचे बघून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
               
वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशिपच्या फायनल नंतर प्रथमच भारताचे गोलंदाज पूर्णतः अपयशी ठरल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्या दरम्यान मोहम्मद सिराजचे दुखापतग्रस्त होणे, जसप्रित बुमराहा व मोहम्मद शमीचे वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर बिलकुल काहीही न चालणे काहीसे शंकास्पद या सदरात मोडले जाते. कर्णधार कोहली पाठीचे दुखणे उदभवल्याने या कसोटीत खेळला नाही. वास्तविक तो सर्वच दिवस पॅव्हेलियन मध्ये बसलेला होता, तर कधी सिमारेषेवर सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करताना दिसत होता. सारासार विचार केला तर डॉक्टर पाठीच्या दुखापत ग्रस्तांना काही ठराविक दिवस बेडरेस्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र कोहली असा कोणताही आराम करताना सामन्यादरम्यान  दिसला नाही. शिवाय तो नेट मध्ये सराव करायचा, स्वतः प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला थ्रो डाऊनचा सराव देत होते. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे दिसते.
              
शार्दूल ठाकूरचा अपवाद वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाने मन लावून गोलंदाजी केली नसल्याचे सामना बघणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात ही बाब आली असेलच. खेळपट्टी फिरकीला साथ देत नसल्याने आर.आश्वीनच्या अपयशाचे आपण समजू शकतो. मात्र बुमराहा व शमीचे अपयश संघासाठी घातक ठरले.
                 
हंगामी कर्णधार केएल राहुल नेतृत्वाच्या परीक्षेत साफ अपयशी ठरला. त्याचे गोलंदाजीतील बदल अनाकलनीय होते. शिवाय क्षेत्ररक्षण लावण्यातही त्याने अनेक चुका केल्या. वास्तविक वनडे व टि-२० चे अधिकृत उपकर्णधरपद त्याच्याकडे आहे. मात्र या प्रकारातील नियमीत कर्णधार रोहीत शर्मा दौऱ्यावर गेला नसल्याने वनडेचे नेतृत्व व रोहीत उपलब्ध नसल्याने कसोटीचे उपकर्णधारपद त्याला मिळाले. त्याचबरोबर विराट कोहली या कसोटीत खेळत नसल्याने राहुलची कर्णधारपदाची लॉटरी लागली पण निकाल त्याच्या विरोधात गेला. 
                   
केएल राहुलची मागील काही दिवसातील उत्कृष्ठ फलंदाजी व धावा त्याला नेतृत्वाच्या स्पर्धेत घेऊन आल्या. परंतु एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात पंजाब संघाची धुळधाण उडाली आहे. तरीही त्याची शिकण्याची तयारी व वय बघता त्याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु पहिल्याच त्याचे परिक्षेत फेल होणे टिम इंडियाला महागात गेले.
                    
भारताची वॉन्डरर्सवर हरण्याची मालिका खंडीत झाली, कोहलीच्या गैरहजेरीत पराभूत न होण्याची मालिका तुटली आणि सलग दुसरा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची नामी संधी निसटली. तसे बघाल तर सध्याचा आफ्रिकेचा संघ आजवरचा सर्वात कमजोर संघ आहे. त्यांनी भारताला या कसोटीत हरविल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार असून त्यांचा आणखी एक बालेकिल्ला केपटाऊन येथे तिसरा कसोटी होणार आहे. तेथे जलदगती गोलदांजाना सहाय्य करणारी खेळपट्टीच असणार असल्याने कागदोपत्री बलाढय पण प्रत्यक्ष मैदानात सातत्य नसलेल्या भारतीय फलंदाजांची सत्वपरीक्षा होणार आहे. शिवाय गोलंदाजांनाही तंदुरुस्त होऊन एकजुटीने हल्ला करावा लागेल. नाहीतर मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेला कसोटी मालिका विजय पुढच्या दौऱ्या पर्यंत पुढे ढकलला जाईल.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close