भारतीय इतिहासाला समाजसुधारणेचा वारसा लाभलेला असून,१९ व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच भेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील अपवादात्मक स्री क्रांतिकारकांमध्ये होती त्यामध्ये सावित्रीबाई फुले या अग्रस्थानी आहेत,त्यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३-जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडूजी नेवसे पाटलांच्या घराण्यात झाला. महात्मा जोतीराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आगळे-वेगळे जोडपे आहे.
सावित्रीबाई फुले यांनी उद्योग,जनसेवा,विद्वत्ता,स्री शिक्षण,सदाचरण,अस्पृश्यता वगैरे गोष्टींच्या जोरावर थोरपणा मिळविला! थोरपणा हा काही सहजासहजी कोणालाही लाभत नाही,त्यासाठी अनेक यातना,कष्ट सहन करावे लागतात.अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, हेच कार्य महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षाने केले.
सावित्रीबाईंचे चरित्र अथांग सरोवरात फुलणाऱ्या कमलपुष्प प्रमाणे सुंदर आहे, जोतीरावांनी त्यांना घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनविले. स्वातंत्र्य नसलेल्या काळात स्त्रियांकरता शाळा म्हणजे अनर्थ व अधर्म असे समजले जात होते. त्याकाळात १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची भारतीय इतिहासातील पहिली शाळा सावित्रीबाईनी सुरु केली.भारतातील मुलींची पहिली शाळा व पहिल्या शिक्षिका,मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई काम करत होत्या.हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस म्हणावा लागेल! त्याकाळात शाळा बंद पाडण्याचे,त्रास देण्याचे, प्रचंड प्रकार घडले पण, सावित्रीबाई डगमगल्या नाहीत,प्रसंगी त्यांना धर्ममार्तंडांमुळे जो त्रास झाला त्यातून त्यांच्या सासर्यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले,त्यांच्या शाळेतील शिकवण्याची व्यवस्था श्रेष्ठ दर्जाची होती कारण त्यांच्या शाळेमध्ये मुक्ता साळवे हिने "धर्माची चिकित्सा करणारा निबंध लिहिला".त्याकाळातील कलेक्टरने त्या शाळेची प्रशंसा केली.तानुबाई बिरजे या पहिल्या वृत्तपत्राच्या संपादिका झाल्या.फातिमाबी शेख या मुस्लिम समाजातील पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. यावरून त्या काळातील सवित्रीबाईंच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा आपल्या लक्षात येतो. स्वतः सावित्रीबाई विना मोबदला आणि शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम करत होत्या. सर्वार्थाने त्या खऱ्या शिक्षणतज्ञच होत्या.
त्या काळात महात्मा फुले यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये होते त्यांनी मनात आणले असते तर सोन्याची टाय आणि सोन्याचाच कोट घालून ते फिरू शकले असते पण, त्यांनी या भारतीय समाजासाठी,स्त्री शिक्षणासाठी आपला देह झिजविला! सावित्रीबाईंनी १८५४ साली "काव्यफुले"आणि पुढे १८९२ साली "बावन्नकशी सुबोध रत्नाकर" हा काव्यसंग्रह प्रकाशित केला,या ठिकाणी ही त्या खऱ्या अर्थाने कवितेच्या आद्यजनक आहेत, त्यातून समाजाला अंधाराकारातून प्रकाशात आणण्याचे मोठे काम केले. 'शिक्षण' या कवितेत त्या म्हणतात "शूद्रांना सांगण्या जोगा आहे शिक्षण मार्ग हा||
शिक्षणाने माणसातील पशुत्व हटते पहा||"
सावित्रीबाई यांनी स्रियांचा कैवार घेऊन अज्ञान,बालविवाह,सती प्रथा, १८२९ साली बंद करण्याचा कायदा इंग्रज सरकारला भाग पाडले.विधवांचे पुनर्विवाह लावून दिले, बालविधवांची बाळंतपणे केली,विधवा विवाह,अन्याय वगैरे अनेक गोष्टींची निर्मूलन केली.स्री शिक्षणाचे महत्त्व समाजास पटवून त्या समाजात जागृती केली.दुष्काळामध्ये दुष्काळग्रस्तांची फार मोठी सेवा केली."सत्यशोधक समाजाचे" नेतृत्व केले,त्यातून गुलामगिरीचा नाश, शिक्षणाची चळवळ,स्त्री शिक्षणाचा प्रसार,सधवा, विधवा स्त्री जातीचा हक्काचा पुरस्कार,अस्पृश्योद्धार, अर्भकावर,आंधळ्या-पांगळ्यावर,भूतदया, सत्याचरण,सत्यनिष्ठा इत्यादी सत्यशोधकाचे कार्य केले. स्वतः मुलबाळ झाले नाही त्यामुळे एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव ठेवले यशवंत! त्याला वैद्यकीय शिक्षण दिले आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला,हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होता,संपूर्ण देशात 'मुलींची शाळा' आणि 'नेटिव्ह लायबरी' सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय या पती-पत्नी कडे जाते. देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात फुले दांपत्यांनी अठराशे १८५४-५५ साली केली. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करीत होत्या.शाळेत जाता येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत आचकट- विचकट बोलत कधी-कधी दगड मारीत,अंगावर चिखल आणि शेन टाकीत असत! शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत दोन साड्या घ्याव्या लागत रस्त्याने जाता येता त्या खराब होत,आणि तरी सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या.सावित्रीबाईनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले होते, सावित्रीबाईं सारखी दयाळू व प्रेमळ अंतकरणाची स्री मी अजूनही कुठे पाहिली नाही यावरून,'विद्येची खरी देवता ही सरस्वती' नसून सावित्रीबाई फुले च आहेत हे आता आमच्या लोकांनी जाणिले."दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती|"
आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने विश्वाला ओळख होणारे आहे.असेच आपले सामाजिक,शैक्षणिक कार्य करत असतांना प्लेग या आजाराने पछाडलेल्या रोग्यांची पुण्यामध्ये सेवा करतांना त्यांनाही प्लेगचा आजार झाला आणि १० मार्च १९९७ रोजी त्यांचं देहवसान झालं!क्रांतीची मशाल विझली!अशा या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीसाठी, समाज सुधारण्यासाठी आणि समाजशील मन्वतंरासाठी अष्टोप्रहर तेवणाऱ्या समई प्रमाणे त्यांनी कार्य केलं!या जयंतीदिनी त्यांना-त्यांच्या विचार-कार्याला माझे कोटी- शतकोटी प्रणाम!विनम्र अभिवादन..!
शब्दांकन :-
शिवश्री.प्रा.सतिष उखर्डे (प्रसिद्ध व्याख्याते,लेखक तथा इतिहास अभ्यासक ) मो.नं.-९४२२९९२३१०

