दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात अवघड अशा सेंच्युरियनवरील विजयाने करणाऱ्या भारतीय संघाचा जोहान्सबर्गच्या वाँडरर्सवर मोठा हिरमोड झाला. नियमीत कसोटी कर्णधार विराट कोहली आकस्मितपणे उदभवलेल्या पाठीच्या पाठीच्या दुखण्याने संघाबाहेर झाला. तर कानपूर कसोटीत शतकी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर पोटदुखीमुळे अनुलपब्ध होता. त्यामुळे मागच्या वर्षी सिडनी कसोटीत जखमी असतानाही झुंजार खेळी करणारा हनुमान विहारी एक वर्षानंतर संघात परतला. तर इंग्लंड दौऱ्यापासून नाशिबाचे फासे हवे तसे पडत असलेल्या केएल राहुलला कोहली ऐवजी नेतृत्व करण्याची संधी मिळाली. टि- ट्वेंटी विश्चषकानंतर झालेल्या प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकण्याची परंपरा राहुलनेही कायम राखली.
मात्र हंगामी कर्णधार राहुलचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचं भारतीय फलंदाजांच्या बेजबाबदार फलंदाजी व आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या नियंत्रित गोलंदाजीवरून सिद्ध झाल्याचे सांगायला आणखी इतर दाखल्यांची गरज असेल असे मला तरी वाटत नाही. सेंच्युरियन कसोटीत शतकी सलामी येणारी मयंक अग्रवाल - केएल राहुलची जोडी यावेळी अपयशी ठरली. मयंकचे लवकर बाद होणे भारताच्या चांगलेच अंगलट आले, कारण त्यानंतर भारताचे सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे विशेष काही न करताच तंबूत परतल्याने भारताच्या अडचणीत मोठीच भर पडली. शिवाय हनुमान विहारी मोठ्या कालावधीनंतर संघात आल्याने तोही दबावात संघासाठी भरीव योगदान देण्यात कमी पडला.
त्याच्यानंतर हंगामी कर्णधार के.एल राहुल अर्धशतकी खेळी केल्यानंतर उसळता चेंडू खेळण्यात चुकला व संघाला वाऱ्यावर सोडून परतला. रिषभ पंतकडून मोठया अपेक्षा असताना त्यानेही संघाला वाटाण्याच्या अक्षता लावून निघून गेला. गेली काही दिवस सापत्न वागणूक मिळत असलेला रविचंद्रन आश्वीनचा खेळ नवीन मॅनेजमेंट आल्यापासून चांगलाच बहरला आहे. बॉल बरोबरच बॅटनेही संघाला मदत करण्याची खासीयत त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याने केलेली सेहेचाळीस धावांची झुंजार खेळी संघाला नामुष्कीतून बाहेर काढण्यात महत्वाची ठरली. त्याच्या शानदार खेळीमुळेच भारताला दोनशेचा टप्पा पार करता आला.
शार्दूल ठाकूर अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असल्याने त्याच्याकडून संकटसमयी चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असताना खाते न फोडताच तंबूत परतल्याने संघाच्या उरल्या सुरल्या आशाही मातीमोल झाल्या. शेवटी बुमराहाने एक षटकार व दोन चौकारांसह नाबाद १४ ठोकल्या. शमीही विशेष करामत करू शकला नाही. तर सिराज शुन्यावर नाबाद राहीला.
दक्षिण आफ्रिकेकडून केवळ दुसरीच कसोटी खेळणारा मार्को जेनसनने सेंच्युरीयन टेस्टच्या दुसऱ्या डावा प्रमाणेच सर्वाधिक चार बळी घेतले तर त्याला रबाडा व ओलिव्हाराने प्रत्येकी तीन बळी घेत भारताच्या फलंदाजांना जखडून ठेवत बादही केले.
प्रत्युत्तरात दिवसअखेर सलामीवीर मार्करमच्या मोबदल्यात पस्तीस धावा काढत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या खेळावर निर्विवाद वर्चस्व राखले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात यष्टीरक्षक रिषभ पंतने कर्णधार डिन एल्गरचा सोपा झेल सोडून भारताच्या भारताच्या अडचणीत वाढच केली आहे. आपल्याला माहीती आहेच पहिल्या कसोटीत एल्गरने दुसऱ्या डावात नांगर टाकून संघाचा पराभव लांबविला होता. रिषभ पंतच्या फलंदाजीतील अपयशाचे टेन्शन त्याच्या यष्टीरक्षणातही जाणवले. तर प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे अपयशी ठरल्याने त्यांच्या विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून दुसऱ्या डावात त्यांचे अपयश पुढील कसोटीतून त्यांची गच्छंती करणार हे निश्चित आहे. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला गोलंदाजांच्या कामगिरीवरच अवलंबून राहावे लागणार असून भारताचे गोलंदाज आफ्रिकन फलंदाजांना कशा प्रकारे लवकरात लवकर गुंडळतात यावरच भारताचे सामन्यातील भवितव्य अवलंबून असणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

