shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेताजी सुभाषचंद्र बोस..!



दिनांक २३ जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीदिन आहे. नेताजींच्या कर्तृत्वाचा दाखला म्हणजे अंदमान. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सुभाषबाबूंनी स्वतंत्र भारताची स्थापना केली.(भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी चार वर्षे ) ही स्थापना सिंगापूरला झाली. सुभाषबाबूंनी आपले मंत्री मंडळ नेमले. यामध्ये ते स्वतः राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनानी झाले. या स्वतंत्र भारताच्या घोषणेला इटली, जर्मनी, ब्रह्मदेश, चीन, जपान या देशांनी मान्यता दिली होती. नेताजींनी जाहीर केलेल्या स्वतंत्र भारताने अमेरिका, इंग्लंड यांचेविरुद्ध युद्ध जाहीर केले. ब्रिटिश हिंदुस्थानचे अंदमान बेट ब्रिटिशांकडून जपानने जिंकून घेतले व  सुभाषबाबूंना भारताच्या राजधानी करीता भेट दिले.
अशाप्रकारे सुभाषबाबूंनी जाहीर केलेल्या स्वतंत्र भारताची राजधानी सिंगापूरहून अंदमानला आली. ही घटना ६ नोव्हेंबर १९४३ रोजी घडली.
 ३१ डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानच्या भूमीत पदार्पण केले. स्वतंत्र भारताच्या फौजा ब्रह्मदेशातून पारतंत्र्यात असलेल्या ब्रिटीश हिंदुस्थानवर चालून आल्या.

 सुभाषबाबूंच्या सैन्यात ३०,००० सैनिक होते. सुभाषबाबूंची सेना आजाद हिंद सेना या नावाने ओळखली जात होती. १८ मार्च १९४३ रोजी आक्रमण करण्यात आले. वास्तविक पाहता यावेळेला पारतंत्र्यात असलेल्या भारतातून स्वातंत्र्याचा जयघोष होणे गरजेचे होते, पण तसे काही घडले नाही. याचे कारण अनेक हिंदी पुढारी तुरुंगात होते आणि काहीजण फक्त स्वातंत्र्याच्या गप्पा मारीत होते. निष्प्रभ होते. मग बंड कोण करणार?

आझाद हिंद सेना आठ सरहद्दींवर  प्राणपणाने लढत होती. सर्व सैनिक कसलेले होते आणि देशभक्तीने प्रेरित होते. इंफाळ आणि कोहिमा येथे घनघोर युद्ध झाले. इम्फाळ आझाद हिंद सेनेच्या ताब्यात येण्याच्या बेतात असतानाच ब्रिटिशांनी हवाईमार्गे आक्रमण केले. सुभाष बाबूंकडे  हवाई फौजा नव्हत्या. परिणामी हिंदी फौजा रंगूनपर्यंत मागे गेल्या. अभिमानाची गोष्ट अशी की आजाद हिंद सेनेचा एकही सैनिक ब्रिटिशांना
 शरण गेला नाही. यावेळी नेताजी रंगूनला होते. तेथे राहणे धोक्याचे होते म्हणून ते हवाइईमार्गे निघाले पण दुर्दैवाने विमानात अपघात झाला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांना वीरमरण आले. आज नेताजींचा जन्मदिवस आहे. यावेळी नेताजींच्या या कर्तृत्वाची आठवण करणे अगत्याचे आहे.
वंदे मातरम्

लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार 
मोबाईल : ९८८१३७३५८५
close