पर्यावरण नासविणारी महाघातकी कृती कोणती याचा गांभीर्याने विचार केला तर त्याचं उत्तर आहे यूज ऍन्ड थ्रो प्रवृत्ती. ही प्रवृत्ती जाणिवपूर्वक रूजविली जाते आहे. पर्यावरण संतुलनाच्या कार्यात यामुळे फार मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
एकीकडे टाकाऊतून टिकाऊचा प्रचार करायचा आणि दूसरीकडे चांगल्या दैनंदिन व्यवहारात वापराच्या वस्तूंच्यास्पेअरपार्टसची उपलब्धता/विक्री बंद करायची. जेणेकरून ग्राहकांना अल्पावधीतच जुने चांगले असूनही नवे मॉडेल खरेदी करणे भाग पडेल अशी यंत्रणा बाजारात कार्यरत आहे.
दाढीच्या रेझरपासून, चप्पल, फर्निचर, पेन, मोबाईल, कॉम्प्युटरचा की बोर्ड, फ्रीज-टीव्हीपासून ते दूचाकी, चारचाकी वाहनांपर्यंत खराब झाले की फेकून द्या असा प्रवाह सद्या चालू आहे. पाण्याच्या बाटल्यांची, कुरकऱ्यांच्या, गुटख्याच्या, औषधांच्या चकचकीत वेष्टनांची, इंजेक्शन सिरीन सुयांची, मास्कची, इलेक्ट्रॉनिकच्या कचऱ्याची तर मोजदाद करता येणार नाही इतका कचरा रोज जमा होतोय. तो जाणार कुठे? सारं जगं आणि बुद्धीवादी, शास्त्रज्ञ, संशोधक, राज्यकर्ते याबाबत काहीच भरीव भूमिका का घेत नाहीत हे न उलगडणारे कोडेच आहे.
पुर्वी चारचाकी वाहने ४०/५०वर्षे आरामात वापरली जायची. त्यांचे स्पेअरपार्टस् देखील सर्वत्र सहजपणे मिळायचे. अलीकडे तर अत्यंत दर्जेदार स्कूटर, मोटरसायकल, चारचाकी वाहने विपुल प्रमाणात दिसतात. ती खराबही होत नाहीत. पण दहा बारा वर्षातच या वाहनांचे स्पेअरपार्टस् मिळणे बंद होते. पंधरा-वीस वर्षात गाडी पासिंग करावी लागते. सरकारी निर्णयामुळे चांगली गाडी कवडीमोलाने विकून नव्या मॉडेलची गाडी कर्ज काढून घ्यावी लागते. जुन्या गाडीचा कचरा होतो.
वापरा आणि फेकून द्या या धोरणाला सोशल मीडियातून प्रोत्साहन दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. सर्वसामान्य माणसाला याचा आर्थिक फटका फार मोठा बसतो आहे. आवाक्यात नसताना देखील मध्यमवर्गीय दिवस रात्र मेहनत करून प्रतिष्ठा जोपासतो आहे तर दुसरीकडे पर्यावरण नाशाचे परिणामही मध्यमवर्गीयांसच भोगावे लागत आहेत.
पूर्वीची उत्पादने दीर्घ काळ वापरली जात असत. पण अलीकडच्या काळात उत्पादने अल्पकालातच नवीन घ्यायला लागतात. हे कटू सत्य आहे. हे पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाच्या संदर्भात अत्यंत घातक आहे.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट,पुणेच्या पर्यावरण आणि आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार, पुणे
मोबाईल : ९८८१३७३५८५

