shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मध्यमवर्गीयांची फरफट...!

*१२४) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जे काही चित्र आहे त्यातून वैचारिक सुसंगतीचा अभाव दिसून येतो आहे. सामाजिक अस्थैर्य पसरलेले आहे. एकीकडे मास्क वापराची सक्ती तर दुसरीकडे कोरोनाचा विषाणू अडवण्यास  मास्क पूर्णतः असमर्थ आहे याची चर्चा. कोणी सांगतो शाळा सुरू करा, कोणी सांगतो बंद करा. याबरोबरच सर्व पातळीवर शासकीय यंत्रणेकडे पहिले की युवा पिढीने पुढे काय करावे अशी संभ्रमाची अवस्था युवकांमध्ये दिसून येते. सरकारच्या, बँकांच्या संगणकीय यंत्रणेची खात्री कोणीच देऊ शकत नाही. 
शासकीय  व बँक कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळतो आहे. बाकी व्यापारी असो की खाजगी कामगार असो सगळ्यांना आर्थिक फटका बसतोय. 

कोणत्याही सामाजिक बाबींची शाश्‍वती राहिलेली नाही. कधी लॉकडाऊन होईल, मास्क, हेल्मेट, पार्कींगची कारवाई होईल या भीतीपोटी सगळेच त्रस्त आहेत. तर दुसरीकडे कोरोनापूर्वी  जशी सार्वजनिक जागेवर अतीक्रमणे, दुकाने होती ती,  राजरोसपणे गर्दी खेचत आहेत. रस्त्यातून चालायचे मुश्किल अशी गर्दी शहरांमध्ये दिसून येते आहे. यामुळे सामान्य माणूस अगदी खचून गेलेला आहे. 

मध्यमवर्गीयांना कोणीही कुठलाही टॅक्स माफ केलेला नाही, कर्जाचे हप्ते भरायला कोणी सूट दिलेली नाही. मध्यमवर्गीयांना कुठेच सूट नाही. महिन्यापूर्वी मी कोकणात गेलो होतो. सहापदरी महामार्गाचे काम चालू आहे. लोकांचे अतोनात हाल होत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर लगेच लोकांकडून टोल घेतला जाईल मात्र आज रस्त्याची कामे होत असताना  मध्यमवर्गीयांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना व त्यांच्या वाहनांचे होणारे नुकसान, त्यांचे वाया जाणारे श्रम तास, शारीरिक त्रास व मनस्ताप  याबाबत, कोणीच विचार करून त्याची भरपाई करण्याबाबत कोणतीही यंत्रणा विचार करायला तयार नाही. मध्यमवर्गीयांच्या त्रासाचे, त्यागाचे मोल कोणालाच नाही.  एकंदरीत काय सर्व आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, आरोग्य पातळीवर मध्यमवर्गीयांसाठी फक्त सहन करण्यापलीकडे कोणताही मार्ग उरलेला नाही. हे सुदृढ समाजव्यवस्थेचे लक्षण नाही व न्याय्यही नाही. असेच चालू राहिले तर पुढे काय होणार? काहीच कळत नाही.
लेखक :
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने
देशभक्तकोशकार, पुणे.
मोबाईल :९८८१३७३५८५
close