श्रीरामपूर । प्रतिनिधी:- सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीरामपूर अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या सर्वच रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांमधून तक्रारी केल्या जात आहे. मात्र या तक्रारींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने दखल घेतल्या जात नसल्याने श्रीरामपूर तालुक्यामध्ये ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सहमती एक्सप्रेस सुसाट असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या तरी सुरू आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे आमदार निधी मधून गावांतर्गत रस्त्याची कामे श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. मात्र सदरील रस्त्याचे निकृष्ट डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच सदर रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांनी सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत सदर काम योग्य पद्धतीने करावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच संबंधित ठेकेदाराकडे केली.
मात्र संबंधित ठेकेदाराने सदर कामात कोणत्याही प्रकारची सुधारणा न करता आहे त्याच पद्धतीने आपले काम पूर्ण केले आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामात अतिशय निकृष्ट मटेरियल वापरून मोठया प्रमाणात गैरकारभार केला असून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच ठेकेदाराला नियमबाह्य काम केल्यामुळे काळ्या यादीत टाकावे, अशी तक्रार माळवाडगांव येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या तक्रारीत देण्यात आला आहे.
दर्जाहीन कामे करून ठेकेदार व 'साबां'चे संबंधित दोषी अधिकाऱ्यांनी शासकीय लाखो निधीचा मोठा अपहार केला असल्याचा घणाघाती आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव,अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीरामपूर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
या निवेदनावर संदीप आसने, साहेबराव आसने,नानासाहेब आसने,अनिल आसने,प्रदीप आसने,विठ्ठल आसने,सतीश आसने,अमोल मोरे,दत्तात्रय मोरे, दादासाहेब अनुसे, बापूसाहेब आसने,पद्माकर आसने,विजय आसने,अतिष आसने,भारत आसने,हरिभाऊ त्रिभुवन,बबन आसने,सुभाष आसने,गोरक्षनाथ आसनेसह आदींच्या सह्या आहे.
श्रीरामपूर सा.बां. उपविभागाचे उपअभियंता नाँटरिचेबल.
माळवाडगांव येथील गाव अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरणामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा फोन नाँटरिचेबल येत असून काही वेळाला फोन लागला तरीही सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूरचे उपअभियंता फोन उचलत नाहीत, त्यामुळे नागरिकांनी निकृष्ट रस्त्याच्या कामांसंदर्भात तक्रारी बाबत संबंधित ठेकेदारांची तक्रार कुठे करावी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
--------------------------------------------------------------
माळवाडगांव येथे, श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियंत्रणाखाली झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असा ठराव माळवाडगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला आहे.

