पूर्णा । वार्ताहर:-
परभणी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग तयार करताना आदर्श मानके व निकष डावलून केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपुर्ण रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाची हस्तांतरणापूर्वीच नियमबाह्यपणे डागडुजी सुरु असून या कामात १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार डॉ.फौजिया खान यांनी आज बुधवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी माजी आमदार विजय गव्हाणे, महंमद गौंस झेन, अली अहमद खान यांची उपस्थिती होती. खासदार डॉ.फौजिया खान म्हणाल्या की, या संदर्भात आपण थेट राज्यसभेत आवाज उठविल्यानंतरही हा प्रकार सुरुच असल्याने संबंधित यंत्रणा सुरुवातीपासूनच रस्त्याच्या गुणवत्तेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज रस्त्याची झालेली अवस्था हा संबंधित यंत्रणेच्या गंभीर दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या कामाची निविदा ही इंजिनियरिंग प्रॉक्युरमेंट ऍन्ड कंस्ट्रक्शन करार असून यामध्ये गुत्तेदाराने सर्वे इन्वेस्टीगेशन, डिझाईन, ड्राईंग , इंजिनियरिंग, प्रोक्युरमेंट, कंस्ट्रक्शन, मटेरीयल्स आणि मेंटनन्स करावयाची असून यासाठी दिनांक २८ मार्च २०१८ रोजी २३७ कोटी आर्थिक तरतुद केंद्र शासनाने केली आहे. हे काम ‘ मेसर्स सारजन इंफ्राकॉन प्रायवेट लिमीटेड अहमदाबाद’ला देण्यात आले आहे. हे काम पुर्ण करण्याचा कालावधी फक्त १८ महिने असा होता, जो की २७ सप्टेंबर २०१९ ला संपलेला आहे. परंतु या कंत्राटदाराने मुळातच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा फॉल्टी तयार केला आहे.
या डी.पी.आर ची अंमलबजावणी करताना इंडियन रोड कॉंग्रेस (खठउ ) आणि चजठढक चे उल्लंघन केले आहे. स्पेशिफिकेन्ससार माती कामाच्या भरावामध्ये दगड वापरण्याची परवानगीच नसते. तसेच ७५ मिली मिटरपेक्षा जास्त आकाराचा मुरुमही वापरता येत नाही. सबग्रेड मध्ये ५० मिमीपेक्षा जास्त मुरुम पार्टोकल साईजचा वापरण्याची मानक परवानगी देत नाहीत. परंतु संबंधित ठेकेदाराने चक्क २००, ३००, ५०० मिमी आकाराच्या दगडाचा वापर केला. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाली आहे. या व्यतिरिक्त एक फुटा पेक्षा जास्त मातीकामाचा थर घेऊन जो पर्यंत पाणी टाकूण दबाई केल्यामुळे ९८ टक्के पर्यंत घनता येत नाही तोपर्यंत दुसरा थर टाकायचा नसतो. असे असतांनाही संबंधित ठेकेदाराने मात्र अर्धा मिटर ते एक मिटरचा एक एक थर टाकून दबाई केली असल्याचे खा.खान यांनी सांगितले.
या प्रकरणातील जबाबदार अधिकारी यांची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी करून दोषींविरोधात गुन्हे नोंदवण्यात यावेत अशी मागणीही खा.खान यांनी केली आहे.

