पूर्णा । सय्यद कलीम:-
शासनाच्या विविध योजनांची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी, पाणीपट्टी, घरपट्टी १०० टक्के वसुली करुन शासनाच्या बक्षीसास पात्र होऊन गावाला नंदनवन बनवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
बुधवारी (दि.१६) पूर्णा तालुक्यातील माखणी येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बायोगॅसचे उद्घाटन व शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माणिकराव आवरगंड हे होते.
माखणी येथील प्रगतीशील शेतकरी जनार्दन आवरगंड यांनी शेतात बांधलेल्या बायोगॅसचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गटविकास अधिकारी सुनिता वानखडे, सभापती अशोक बोकारे, विस्तार अधिकारी साहेबराव सुरेवाड, कृषी अधिकारी अशोक राऊत, चिंचटाकळीच्या सरपंच माधुरीताई अनिल मोरे, आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके, कृषी सुपरवायझर मानवत गंगा रणेर, कृषी सहाय्यक मुक्त मगर, कृषी अधिकारी दहीवडे, पुर्णा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोंविदराव आवरगंड, गजानन गडदे, प्रभाकर हरकळ, संभाजी भोसले, विशाल भोसले, पंडितराव थोरात, संजय जोशी, शिवाजी शिराळे, ग्रामसेवक भुसारे, संजय भोसले, संवादतज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, पत्रकार सुरेश मगरे, गोविंदराव दुधाटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सरपंच गोविंदराव आवरगंड, प्रा. रामेश्वर आवरगंड यांनी ग्रामस्थांच्या वतीने विविध समस्या मांडुन सोडविण्यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी निधी देण्याची मागणी केली. यावेळी डॉ.दिलीप शृंगारपुतळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या माध्यमातून गावाचा विकास शक्य असल्याने ग्रामस्थांनी ग्रामगीतेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी देखील आपले गावच तिर्थ असल्याने गावातील शाळा, स्मशानभूमी सुधारण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या विविध योजना राबविण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचालन सहशिक्षक गजानन पवार यांनी तर आभार माधवराव आवरगंड यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशाला शाळेची पाहणी करून टाकसाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच सौ. गंगा रणेर यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

