शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
छत्रपती संभाजी राजेंच्या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास जिल्ह्यात चक्काजाम करणार
"सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजें सोबत"
अहमदनगर : मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी 26 फेब्रुवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात, विशेष करून मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता व असंतोष पसरलेला आहे. मराठा आरक्षणातील कायदेशीर अडचणी दूर करून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत आरक्षणा बरोबरच मराठा समाजाच्या इतर काही जिव्हाळ्याच्या मागण्या पूर्ण करणे राज्य सरकारला शक्य आहे. यात प्रामुख्याने ESBC व SEBC आरक्षणाच्या निर्णयानंतर ज्या मराठा उमेदवारांची शासकीय सेवेत निवड प्रक्रिया झालेली आहे अशा उमेदवारांना नियुक्त्या देणे गरजेचे आहे. मात्र त्या दिल्या गेलेल्या नाहीत. या नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्यात. मराठा समाजासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आग्रही मागणी नंतर निर्माण झालेली सारथी संस्था पूर्ण ताकतीने कार्यान्वित करण्यात राज्य सरकार आतापर्यंत तरी सपशेल अपयशी ठरलेले आहे. सारथीसाठी भरीव निधी देऊन या संस्थेच्या उपक्रमांना गती देण्यात यावी. गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र अद्यापही याबाबत कुठलीही ठोस कृती करण्यात आलेली नाही. ही वस्तिगृहे तात्काळ सुरू करावीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला कर्ज व्याज परताव्याची जी दहा लाखांची मर्यादा आहे ती वाढवून पंचवीस लाख करण्यात यावी. या महामंडळावर आवश्यक ते सर्व कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ नियुक्त करून महामंडळाचा कारभार गतिमान करावा. मराठा आरक्षण आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतलेले नाहीत. या प्रक्रियेतील जाचक अटी दूर करून सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. मराठा आरक्षण आंदोलनातील शहिदांच्या वारसांना एसटी महामंडळात नव्हे तर राज्य सरकारी सेवेत नोकरी देण्यात यावी.
तसेच अतिशय महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाबाबत न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारसी बाबत सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेल्या बाबी, तसेच न्यायमूर्ती भोसले समितीने यासंदर्भात राज्य सरकारला केलेल्या शिफारशी यावर राज्य सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. मराठा समाज पुन्हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार कुठलीही कृती करणार नसेल तर मग मराठा समाजास ५० टक्केच्या आत अथवा बाहेर, कोणतेच आरक्षण मिळू शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजास सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत असलेल्या व्याख्येत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरविण्यासाठी गंभीरपणे पावले उचलावीत. अशा मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचे निर्णायक पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराला समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी जर आमरण उपोषण करावे लागणार असेल तर समाजालाही आत्मचिंतन करावे लागेल. निद्रितावस्थेतून जागे होऊन आता पुन्हा संघटित होणे आवश्यक आहे. याबाबत आज नगर शहरातील हॉटेल यश पॅलेस येथील सेमिनार हॉलमध्ये जिल्ह्यातील मराठा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यात मराठा क्रांती मोर्चा चा प्रवास व त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सामाजिक, राजकीय व न्यायालयीन घडलेल्या घडामोडी या संदर्भाने सखोल विचारमंथन करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पोटतिडकीने यावेळी भूमिका मांडल्या. सरकार जर शिवछत्रपतींच्या वारसाला आमरण उपोषण करण्यास भाग पाडत असेल तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. सरकारला याची गंभीर किंमत मोजावी लागेल. असा गर्भित इशारा आज मराठा कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला. २६ फेब्रुवारीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शेकडो वाहनांनी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतील. तसेच जिल्ह्यातही समाज रस्त्यावर उतरवण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व गटात बैठका घेऊन जागृती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती संभाजी राजांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य न केल्यास समाज पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरेल, 27 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात चक्काजाम केले जाईल असा इशाराच पदाधिकाऱ्यांनी या बैठकीतून दिला आहे. मराठा समाज बांधवांनी, तसेच समविचारी घटकांनी संभाजीराजांच्या सोबत संपूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरावे असे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.
बैठकीस संजीव भोर, ॲड. सुभाष जंगले, नितीन पटारे, शरदनाना थोरात, देवेंद्र लांबे, बाबासाहेब भांड, मधुकर म्हसे, अनिकेत आवारे, डॉ.रवींद्र महाडिक, सोमनाथ माने, ॲड. योगेश गेरंगे, विशाल म्हस्के, वैभव कदम, आदिनाथ चंद्रे, संतोष घोलप, गोरक्षनाथ माळवदे, प्रीतम पाटील, विकास शिर्के, योगेश खेंडके, राम झिने, रोहित वाळके, प्रशांत लवांडे, शाम उदागे, शुभम बंब, अभिजीत सरनोबत, खंडू सातपुते, संतोष कोल्हे, बाळासाहेब शेळके, भाऊसाहेब वाडेकर, बाळू कोकाटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

