shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजस्वी तारा....संत रोहिदास महाराज


      राष्ट्रीय संत रोहिदास महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी जवळ असणाऱ्या मांडूर गावात ई.स. १३७६ साली माघ पौर्णिमेस रविवारी चर्मकार कुळात एका साधूच्या आशीर्वादाने रघु आणि कालसी यांच्या पोटी झाला. 

       सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने या पुत्राचे नाव 'रविदास' असे ठेवण्यात आले. आणि पुढे हाच तेजस्वी पुत्र संपूर्ण भारतवर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे 'संत रोहिदास'झाले. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत कि ज्यांना विविध नावानी ओळखले जाते. बंगालीमध्ये रुईदास, रुयदास, राजस्थानिमध्ये रोहिदास, मराठीत रविदास पंजाबीमध्ये रैदास अशी त्यांची प्रचलित नावे आहेत.

      आई कालसी ही धार्मिक आणि रामभक्त होती. त्यांच्या वडीलांचा व्यवसाय चांभार हा होता. वडील रघु हे काशीक्षेत्री येणाऱ्या जाणाऱ्या साधुसंतांची शक्य तितकी सेवा करीत असत. आईवडील दोघेही सात्विक वृत्तीचे होते. आई वडिलांच्या संस्कारामुळे त्यांना लहानपणापासूनच कीर्तन, प्रवचन ऐकण्याची आवड, संतांच्या प्रभावाखाली राहणे, यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली. ते मोठे होतील तसे त्यांच्यातील देशभक्ती, देवभक्ती वाढत चालली. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, दारिद्र्य - श्रीमंती यामधील भेदभाव कसा दूर करावा या विचारांनी त्यांना रात्रंदिवस झोप लागत नसे. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह लोना नावाच्या मुलीशी झाले. त्यांना विजयदास नावाचा मुलगा झाला.

      स्वामी रामानंद यांना संत रोहीदासांनी आपले गुरु मानले. संत कबीरदास हे संत रोहीदासांचे समकालीन संत होते, आणि संत मीराबाई या सवर्ण समाजातील असतानाही चर्मकार समाजातील संत रोहीदासाना त्यांनी आपले गुरु मानले होते. तत्कालीन जातीयतेला न जुमानता अस्पृश्य समाजातील एका संताला गुरु मानून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे, यातूनच रोहीदासांचे मोठेपण सिद्ध होते. 

        संत रोहिदास हे रामभक्ती करण्यात दंग असे. ते हाताने चप्पल बनवायचे काम करत तर तोंडाने राम नामाचा जप करत. ते साधुसंताना फुकट जोड देत असत. रामभक्त रोहीदासांच्या भक्तीवेडामुळे त्यांच्या व्यवसायाचे आणि संसाराचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना वेगळे काढले. तरीदेखील त्यांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही. संत रोहिदास म्हणतात,

“अब कैसे छुटे राम रट लागी | 
प्रभू जी, तुम चंदन हम पानी,
जाकी अंग-अंग बास समानी" ||

या ओळीवरून कळते कि, संत रोहिदास भगवंताला आपला अविभाज्य भाग मानत त्यांना देवाशिवाय जीवनाची कल्पनाही करवत नव्हती.

        मन शुद्ध/पवित्र असेल तर कुठेही समाधान लाभते, असा विचार असणारे रविदास त्यांच्या दोह्यातून म्हणतात, *“मन चंगा तो कठौती में गंगा”* माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलाच पावित्र्य दिसून येते, त्यासाठी आपला दृष्टीकोन तसा असायला हवा. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता कळून येते

समाजकार्य
संत रोहिदास यांनी भारतभर फिरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत भारताला अध्यात्मिक आणि सामाजिक उंचीवर नेऊन ठेवले. संत रोहिदास हे मानवतावादी संत होते. त्यांनी समाजाला कल्याणाचा मार्ग दाखवला.

      तत्कालीन समाजव्यवस्थेतील शुद्र मानला जाणाऱ्या समाजाचा प्रत्येक घटक सुखी व्हावा, एकमेकांप्रती आदर निर्माण व्हावा, जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, अशी विचारधारणा असणारे संत रविदास यांनी सामाजिक कार्याचा प्रसार संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात केला.

माहिती संकलन
श्री. गोरक्षनाथ कुर्राडे
सामाजिक कार्यकर्ते, श्रीरामपूर.
 जय रोहिदास🚩
close