प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या निवडी देखील काल संपन्न झाल्या आहेत. सगळीकडेच अगदी अटीतटीच्या वातावरणात निवडणूक झाली आहे. बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. यातील केज नगरपंचायतीची निवडणूक देखील खूप चुरशीची झाली आहे.
या निवडणुकीत मतदारांनी काही मातब्बर राजकीय मंडळींना घराचा रस्ता दाखवला आहे. परंतु जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख नेते असलेले हारुणभाई इनामदार "हारकर भी जीत गये है" अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सध्या केज शहरात ऐकायला मिळत आहेत. हारुणभाई यांनी आपला राजकीय करीश्मा दाखवून दिला आहे. या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी एका सदस्याची कमी होती म्हणून केज शहराच्या विकासा करीता काँग्रेस सोबत एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली. केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हारुणभाई यांच्या नावाची जोरदारपणे चर्चा चालू आहे. हारुणभाई यांच्या या कामगिरीचे जनतेतून स्वागत होत आहे. विविध वृत्तपत्रातून त्यांच्या बातम्या मोठ्या मथळ्याखाली प्रसिद्ध झाल्या आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडीपेक्षा राजकीय वर्तुळात हारुणभाई यांच्याच नावाची चर्चा बीड जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा जोरात चालु झाली आहे.

