*इंदापूर प्रतिनिधी :ता. १२* :- स्वातंत्र्य सेनानी नागसेन तथा शाहिर जंगम स्वामी यांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकार तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पोवाड्याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले असे प्रतिपादन भिमाई आश्रमशाळेचे सहशिक्षक नानासाहेब सानप यांनी केले. यावेळी माध्यमिक आश्रमशाळेचे सतीश कोल्हे सरांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार तर तथागत बुद्धांच्या मुर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर जंगम स्वामी यांची ११५ वी जयंती संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात संस्थेचे संचालक गोरख तिकोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सानप म्हणाले की, शाहिर जंगम स्वामी यांचा जन्म भोंगवली (ता. भोर जि पुणे ) येथे झाला असून भोरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्रजी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाहिरी,पोवाडे आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करून इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात समाज मन तयार केले. सन १९४२ चले जाव आंदोलनात सक्रिय होते.
सानप पुढे म्हणाले की, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरेंना स्वामींचा सहवास लाभला. नागसेन तथा जंगमस्वामी यांना शासन दरबारी खऱ्या अर्थाने मखरे तात्यांनीच न्याय मिळवून दिला. महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दखल घेऊन जंगम स्वामींना दलित मित्र पुरस्काराने गौरवले. स्वामींचा १०० वा वाढदिवस भिमाई आश्रमशाळेत साजरा झाला असून,त्यांची आठवण म्हणुन संस्थेच्या मुलींच्या निवासी वसतिगृहास नागसेन तथा शाहीर जंगमस्वामी यांचे नाव दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांनी दिल्याचे स्वामींच्या कार्याला उजाळा देताना नानासाहेब सानप यांनी बोलतांना आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
यावेळी प्रा. युवराज बन सर व संस्थेचे सर्व विद्यार्थी, प्राचार्या, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

