प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कर्जत: दि. ११/ कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
गुरुवार, दि. १० रोजी सकाळी सात वाजेच्या पूर्वी कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारातील ज्वारीच्या पिकात कमलाबाई चांगदेव वाघ यांचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसत होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात रामदास चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, दिनकर मुंडे आदींनी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे. सदर घटनास्थळी श्वान पथकास बरोबर घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे.

