राहुरी । प्रतिनिधी दि.०१ : गेल्या दोन वर्षांपासुन सतत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कांदा, सोयाबीन, कापुससह ईतर अनेक पिके उपळुण गेली. अशा परिस्थितीत शासनाकडुन अपेक्षित कुठलीच मदत शेतकर्यांना मिळाली नाही. त्यातच कोरोना माहामारीने थैमान घातलेले असताना कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची, सामान्यांची लूट केली जात आहे.
यात शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय पुर्णतः तोट्यात आला आहे. मात्र एकीकडे डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, पशुखाद्य वैद्यकीय उपचार, शैक्षणिक खर्च यांचे दर वाढतच आहेत. या सर्व कारणांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची व आत्महत्तेची वेळ आली आहे, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी प्रसिद्ध पत्रकात प्रसिद्ध केले आहे.
अतिवृष्टीत भुसार पिकांचे नुकसान झाले, परंतु पाण्याची सर्वत्र धरणे पुर्ण भरुन झाल्याचा आनंद अश्या परिस्थितीत ऊसाचे पिक वाचल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात काहीसे आनंदाचे वातावरण होते, परंतु राहुरी तालुक्यात दोन साखर कारखाने असताना देखील कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस अल्प प्रमाणात व बाहेरील ऊस मोठ्या प्रमाणात आणून तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करत असून ऊसाला तुरे आल्याने ऊसाची वाढ थांबलेली आहे,
वजन मोठ्या प्रमाणात घटत आहे. कार्यक्षेत्रात जे ऊस तोडणी होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असल्याचे बोलले जात आहे व ऊस तोडण्यासाठी काही अधिकारी आणि काही समाज कंटक दारु, मटणची पार्टी घेऊन रोख रक्कमची सौदेबाजी शेतकऱ्यांकडे होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ऊस आजही तसेच शेतात ऊभे आहेत.
विहीर, बोअरवेलला पाणी आहे, पण थकबाकीच्या नावाखाली महावितरण सक्तीची विज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा बंद करत आहे, त्यांच्याच सांगण्यावरूनच काही संघटना नाटकी आंदोलन करुन आम्ही पाच पाच हजार रुपये भरु असे शेतकऱ्यांच्या वतीने बोलत आहेत. पण प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना एकही रुपया भरु देणार नाही, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. धरण भरलेले असताना पाटपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला आहे. तेव्हा कुठे पाणी सोडण्यात आले. पाटाला पाणी सोडले पण अनेक चा-यांना अजुनही पाणी सोडले जात नाही. गहु, कांदा, हरबरा हे पिक धरण भरलेले असताना अनेक शेतकऱ्यांना करता आले नाही. ज्यांनी निवडणुकीत बीडला पाणी जाऊ देणार नाही असे बोललेह होते त्यांनीच राहुरीतील शेतकऱ्यांचे पाणी बंद करुन पिके वाळवायचे काम केले.
ज्या मतदारांनी निवडणुकीत आपल्याला मतदान केले त्यांचे ऊस तोडण्याऐवजी बाहेरील ऊस आणुन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्तेची वेळ आणली आहे, असा सवाल सुरेशराव लांबे यांनी केला.
अहमदनगर जिल्ह्यात सर्वच कारखानदार कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत ऊसाला भाव कमी देतात. त्यातच नगर जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत राहुरी तालुक्यातील कारखाने ३०० ते ४५० रुपये भाव कमी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुट करत आहेत. काही बाहेरील कारखाने राहुरीतील ऊस नेऊन २८०० रुपये भाव देतात, मात्र यांना जवळ वाहतुक असुनही भाव देता येत नाही, या सर्व गोष्टींवर राहुरी तालुक्यातील व राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व सर्व सामान्य नागरीक नक्कीच येणा-या काळात विचार करतील व प्रस्थापितांना तरुण पिढी उत्तर देईल.
संजीवनी व कोळपेवाडी कारखान्याप्रमाणे २५०० ते २५५५ प्रती टन पहिले पेमेंट अदा करुन कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस आणणे थांबवून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा नामदार बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार स्टाईलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.

