भारत व वेस्ट इंडिज यांच्या झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने तीन -शुन्य अशा फरकाने जिंकल्यानंतर एक अनोखे समिकरण समोर आले आहे. वनडे, टि ट्वेंटी व कसोटी अश्या क्रिकेटच्या तीनही प्रारूपात मिळून या दोन संघात आता पर्यंत २५१ सामने खेळण्यात आले असून भारताने ९९ विजय व ९९ पराजय मिळवून यश अपयशाच्या पायरीवर बरोबरी साधली आहे. शिवाय या दोन संघात ४६ सामने अनिर्णित राहीलेत तर पाच सामने इतर कारणांमुळे निकाली निघू शकले नाहीत.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर या दोन संघात सोळा फेबुवारी पासून तीन टि- ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून या मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी तो भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कारण या सामन्यातील विजय भारताचा विंडीजवरील शंभरावा विजय असेल आणि जर पराभव झाला तरी तो भारताचा शंभरावा पराभव असेल. म्हणजेच भारतासाठी जशी हि ऐतिहासीक घटना असेल तशीच ती विंडीजसाठीही असणार आहे. त्यांचाही भारताबरोबर या सामन्यातील जय - पराजय प्रत्येकी शंभरावाच असणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार यात कुठलेच दुमत नाही.
पहिल्या टि- ट्वेंटी सामन्यात जर भारताचा पराभव झाला तर क्रिकेटच्या तीनही प्रारूपात मिळून विंडीज विरूध्द शंभर पराभव होणारा भारत तिसरा देश ठरेल. यापूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विंडीजविरूध्द शंभरपेक्षा अधिक सामने हरणारे देश ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियाने विंडीज विरूध्द आतापर्यंत कसोटी, वनडे व टि २० मिळून एकूण २७६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने २४१ जिंकले तर १०३ सामने हारले आहेत. तर चार सामने टाय झाले. २५ अनिर्णित राहीले तसेच तीन सामन्यांचा काही कारणास्तव निकाल लागू शकला नाही.
या श्रृंखलेतील दुसरा संघ इंग्लंडने विंडीजविरूध्द आतापर्यंत २८६ सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडला ११३ विजय व ११६ पराभव मिळाले आहेत. या दोन संघातील ५१ सामने अनिर्णित राहिले आहेत. तर सहा सामने कोणत्याही निर्णयाविना अपूर्ण राहिले आहेत. भारताने पहिला टि-२० सामना जर जिंकला तर भारत विंडीज विरुद्ध शंभरावर विजय मिळविणारा तिसरा देश ठरेल.
वेस्ट इंडिज विरूध्द अशी कामगिरी करण्याच्या जवळपास पाकिस्तानचा संघही आला असून त्यांनी विंडीजविरूध्द एकूण २०९ सामने खेळले असून त्यापैकी ९६ सामने जिंकले तर ९२ सामन्यात पराभव पत्करला आहे. शिवाय ३ सामने झाले असून १५ सामने अनिर्णित राहिले आहेत तर तीन सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही.
वेस्ट इंडिज हा जागतिक क्रिकेट मधील मोठा चमत्कारीक देश आहे. हा एखादया दिवशी जगातल्या सर्वात बलाढय संघाला हरवेल तर दुसऱ्याच दिवशी अगदी किरकोळ संघाकडून हारू शकतो. सध्या विंडीजचा संघ गुणवान खेळाडूंनी भरलेला असून नुकतीच मायदेशात बलाढय इंग्लंडविरुद्ध टि-२० ची मालिका जिंकून आल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावर असेल. परंतु भारतात आल्यानंतर वनडे मालिकेत सडकून मार खाल्ल्याने त्यांची मानसिकता कशी असेल हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल.
भारताचा संघ मायदेशात जरी प्रबळ असला तर सध्या भारतीय संघही जडण घडणीच्या प्रक्रियेतून जात आहे. शिवाय खेळाडूंच्या दुखापती व कोविड-१९ ने संघातील बरेचसे खेळाडू प्रभावित झाल्याने भारतीय संघासमोरही अडचणींचा डोंगर उभा आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर जो संघ मात करेल तो विजेता ठरेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

