राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोनवरून नगरपरिषदेतील अनियमीत कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित.
साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यासंदर्भात इंदापूर नगरपालिकेकडे दिले पत्र.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर नगरपरिषद अनियमीत कर्मचाऱ्यांना नियमीत करत नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात इंदापूर नगरपरिषदे समोर सर्व अनियमीत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दि.२५ जानेवारी पासून साखळी उपोषणास सुरवात केली होती.येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक लावून मार्ग काढला जाईल असे आश्वासन मंत्री भरणे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर हे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आलेय.
गेल्या दहा दिवसापासून हे आंदोलन सुरु होते.आंदोलनाच्या दहाव्या दिवशी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे,माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे यांच्या समक्ष सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी आंदोलक कर्मचाऱ्यांचे बोलने करुन दिले. येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांसोबत सचिवांसोबत बैठक लावून मार्ग काढला जाईल असे आश्वासन मंत्री भरणे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलक कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण स्थगित करीत असल्याचे लेखी स्वरूपात दिले असून मुख्याधिकारी कापरे यांचे समक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी गुरूवारी दि.०३ फेब्रुवारी रोजी भ्रमणध्वनी वरुन संपर्क झाला. त्यांच्याशी सदर उपोषणा संदर्भात मंत्रालयात बैठक लावण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याने व इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व इंदापूर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही हे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही या आंदोलकांची भेट घेऊन आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी देखील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले होते.
इंदापूर नगरपरिषद अनियमीत कर्मचारी गेली 26 ते 27 वर्ष नगरपरिषद मध्ये सेवा करीत आहेत. कोरोना काळामध्ये ही सदरच्या कर्माचा-यांनी अहोरात्र काम केले आहे सदरच्याच कर्मचा-यांनी भारत सरकार कडून मिळणारा स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कार सलग 4 वर्ष मिळविला आहे. आम्ही गेली 27 वर्ष कामावर असून आम्हांला सन 2005 पासून अनियमीत ठरविणेत आलेले आहे. आम्हांला 5 व्या वेतन आयोगाने पगार मिळतो त्यामुळे आमच्या वर आर्थिक कुचंबना होत आहे. आम्हांला न्याय कधी मिळणार याची वाट पहात जवळ जवळ 10 कर्मचारी मृत्यू पावले आहेत.महाराष्ट्र शासन अजून किती कर्मचारी मयत होण्याची वाट पहाणार आहे. असा सवाल भारतीय मजदूर संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य मोहन शिंदे यांनी उपस्थित केला होता.

