पूर्णा । वार्ताहर :-
दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड ते मनमाड या लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम पुढील आठवड्यात सुरु होईल असे स्पष्ट संकेत आहेत.
नांदेड ते मनमाड या लोहमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामांसाठी मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरीकांनी वर्षानुवर्षापासून अपेक्षा बाळगल्या. लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रवाशी संघाने प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळेस पाठपुरावा करावा, या दृष्टीने विविध मार्गाने प्रयत्न केले. वर्षानुवर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा केला. काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या मागण्यांसदर्भात रेल्वे मंत्रालयासह संसदेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नसुध्दा केला. परंतु, रेल्वे विभागाने या दोन्ही मागण्यांसंदर्भात मंजूरी पलीकडे नया पैसासुध्दा उपलब्ध केला नाही.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मध्यंतरी ‘वंदे भारत’ या रेल्वे योजनेची घोषणा केली. पाठोपाठ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्याचे भूमीपुत्र या नात्याने ‘वंदे भारत’ रेल्वे मराठवाड्यातून धावली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. विशेष म्हणजे ‘वंदे भारत’ या योजनेंतर्गत रेल्वे केवळ विद्युतीकरण असणार्या मार्गावरुनच धावणार आहे. त्यामुळेच राज्यमंत्री दानवे यांनी ‘वंदे भारत’ या योजनेत सेमी हायस्पीड रेल्वे या मराठवाड्यातून धावाव्यात, या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्या दृष्टीनेच विद्युतीकरणाची कामे पुढील आठवड्यात सुरु केली जातील, असे स्पष्ट संकेत आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना पुढील आठवड्यापासूनच कामे सुरु होतील व २०२३ अखेरपर्यंत विद्युतीकरणाची कामे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला.
मराठवाड्यातील नांदेड ते जालना आणि जालना ते मनकाड या मार्गावर दोन टप्प्यात विद्युतीकरणाची कामे केली जाणार असून त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे मार्गांना मोठा फायदा होणार आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेचा वेग प्रतितास साधारण १२० ते १३० किलो मीटर असा असेल. तसेच या मार्गावर काही नविन रेल्वे प्रामुख्याने इंटरसिटी रेल्वे सुरु होतील, असे संकेत आहेत.
दरम्यान, जालना ते जळगाव या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचेही काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

