पूर्णा । वार्ताहर :
गंगाखेड पोलिस ठाण्यातील कर्मचारी नवनाथ पांडूरंग लोखंडे यांच्या विरोधात तक्रारकर्त्याकडून ८० हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधिक्षक किरण बिडवे यांना तक्रारकर्त्याने १७ फेबु्रवारी रोजी एक तक्रार नोंदवून त्याचे जेसीबीवर गुन्हा दाखल न करण्याकरीता तसेच तक्रारकर्ता याच्या भावास अटक न करण्याकरीता पोलिस नाईक नवनाथ लोखंडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे नमूद केले. या आधारे पथकाने महातपूरी फाट्यावर सापळा रचला परंतू, संबंधित पोलिस कर्मचार्यास संशय आला. त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. परंतु, या खात्याने पडताळणी केली तेंव्हा पोलिस नाईक लोखंडे यांनी तक्रारकर्त्याकडून १ लाख रुपयांची लाच मागितली. त्या तडजोडीतून ८० हजार रुपये स्विकारल्याचे कबूल केले. ते निष्पन्नही झाले. त्यामुळे गंगाखेड पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचार्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.
दरम्यान, पोलिस अधिक्षक राहूल खाडे यांच्या नेतृत्वाखाली उपअधिक्षक किरण बिडवे, चंद्रशेखर निलपत्रेवार, अनिल कटारे, सचिन धबडगे, माणिक चट्टे, कुलकर्णी, जनार्धन कदम, शेख मुखीद, मुख्तार, दंडवते, हबीब यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला.

